मुंबई: महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करावे व या मंडळातील गैरकारभाराची सखोल चौकशी करावी यासाठी शिवसेनेचे विधानपरिषद आमदार विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यानंतर मंडळाच्या कारभारातील अनियमितता व शासनाकडे आलेल्या तक्ररी याची दखल घेऊन सदर मंडळ बरखास्त करीत आहे अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधान परिषदेत केली.
महाराष्ट्र शासनाने सन 2018 मध्ये महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. या मंडळाशी ८३ शाळांना संलग्नता देण्यात आली होती. परंतु हे मंडळ स्थापन करतांना त्याचा अभ्यासक्रम कसा आहे याबद्दल पारदर्शकता पाळली गेली नव्हती.
अभ्यासक्रमात असणाऱ्या त्रुटी व वाद याबाबत सरकारकडे पालक व शिक्षणतज्ञ यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील संलग्न शाळांनी शैक्षणित वर्ष २०२० - २१ करिता अद्याप प्रवेश प्रक्रियासुध्दा सुरु केलेली नाही त्यामुळे पुढील वर्गांच्या नियेजनाबाबत पालक व शिक्षकांमध्ये संभ्रमाची अवस्था होती.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ अधिक सक्षम केले जाईल व आंतरराष्ट्रिय शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान केले जाणार नाही याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिल्याचे आमदार पोतनीस यांनी लोकमतला ही माहिती दिली.