Join us

महाराष्ट्र ही कोहिनूर हिऱ्यांची खाण, सुधीर मुनगंटीवार यांचे उदगार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 11:30 AM

Sudhir Mungantiwar : गोऱ्यांनी आपल्याकडचा एक कोहिनूर हिरा नेला, पण महाराष्ट्र कोहिनूर हिऱ्यांची खाण आहे. एकापेक्षा एक सरस हिरे असलेल्या कलाकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करणे हा महाराष्ट्र शासनाचा गौरव आहे.

मुंबई : गोऱ्यांनी आपल्याकडचा एक कोहिनूर हिरा नेला, पण महाराष्ट्र कोहिनूर हिऱ्यांची खाण आहे. एकापेक्षा एक सरस हिरे असलेल्या कलाकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करणे हा महाराष्ट्र शासनाचा गौरव आहे. ४८ पैकी १० भारतरत्न याच भूमीत जन्मले. पद्म पुरस्कारांमधले १० टक्के पुरस्कार महाराष्ट्रात असतात. या महाराष्ट्रात जन्मल्याचा अभिमान असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. पं. भीमसेन जोशी, प्रभाकर पणशीकर, अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २०१९, २० आणि २१ या वर्षातील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलांगणात आयोजित करण्यात आलेला हा सोहळा सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शालेय शिक्षण, मराठी भाषा तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभाग प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभाग संचालक बिभीषण चवरे यांच्या उपस्थितीत पार पडला. 

दीपप्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि पाच लाख रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांना २०२० वर्षातील, पं. शिवकुमार शर्मा यांना २०२१ मधील भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्नी मनोरमा शर्मा आणि मुलगा राहुल शर्मा यांनी शिवकुमार शर्मांचा पुरस्कार स्वीकारला. रत्नाकर मतकरी (२०१९-२०), दत्ता भगत (२०२०-२१), सतीश आळेकर (२०२१-२२) यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मतकरींचा पुरस्कार त्यांच्या पत्नी प्रतिभा यांनी स्वीकारला. मधुवंती दांडेकर (२०१९-२०), दीप्ती भोगले (२०२०-२१), नेपथ्यकार सुधीर ठाकूर (२०२१-२२) यांचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

याखेरीज २०१९, २० आणि २१ या वर्षातील संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा शाल, मानपत्र व एक लाख रुपये देऊन सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :महाराष्ट्र