Join us

'कर्नाटक वाल्यांचा रस्ता कोल्हापुरातून जातो'; धनंजय महाडिकांनी दिला थेट इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2022 12:03 PM

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ३३ गावांवर दावा केला होता.

Maharashtra Karnataka Border Dispute:  गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ३३ गावांवर दावा केला होता. यावर राज्यातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.  काल बेळगावमध्ये काही संघटनांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केली, याचे पडसाद पुण्यासह महाराष्ट्रात उमटले आहेत. कर्नाटकच्या वाहनांना काळे फासून निषेध व्यक्त केला जात आहे. कर्नाटकवर सर्वपक्षीय नेत्यांनी टीका केली आहे, खासदार धनंजय महाडिक यांनीही या घटनेचा निषेध करत, कर्नाटकला इशारा दिला आहे. 

Maharashtra Karnataka Border Dispute: “सीमाप्रश्नासंदर्भाची सगळी माहिती अमित शाहांपर्यंत पोहोचवणार”: देवेंद्र फडणवीस

'आमच्या कोल्हापुरपासून १० किलोमीटर अंतरावर कर्नाटक सुरू होते. हा वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. काल झालेल्या घटनेचा मी निषेध करतो. रस्त्यावरची गुंडगीरी यात शोभत नाही. त्यांना बाहेर कुठेही जाताना कोल्हापुरातून जावे लागते. कोल्हापूर असेल सोलापूर असेल त्यांच्या वाहनांना महाराष्ट्रातूनच जावे लागते हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला. 

'या प्रकरणावर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅक्शन घेतली आहे. वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आज या वादावर निर्णय होईल असं वाटते, असंही धनंजय महाडिक म्हणाले. आपल्या नागरिकांच्या सोई सुविधेसाठी आपले सरकार काम करत आहे. विद्यार्थ्यांनाही सुविधा मिळत आहे. काल काही लोकांनी केलेला हा प्रकार निंदनीय आहे याचा निषेध आम्ही करतो, असंही धनंजय महाडिक म्हणाले. 

“सीमाप्रश्नासंदर्भाची सगळी माहिती अमित शाहांपर्यंत पोहोचवणार”

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. तसेच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पुण्यातही कर्नाटकच्या बसेस लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली जात आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सीमाप्रश्नासंदर्भातील सगळी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपर्यंत (Amit Shah) पोहोचवणार असल्याचे सांगितले आहे. 

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. या घटनेप्रकरणी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. बोम्मईंनी याबाबतीत कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे म्हटले आहे. हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर टाकणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे की नाही हे पाहणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

टॅग्स :धनंजय भीमराव महाडिकभाजपादेवेंद्र फडणवीसकर्नाटक