ठाणे : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ६०६ शेतकऱ्यांकडून काजूच्या डब्यांची खरेदी करण्याच्या बहाण्याने करोडोंचा गंडा घालून पसार झालेल्या दीपककुमार पटेल ऊर्फ अमितकुमार असनानी (३६, रा. अहमदाबाद) याच्यासह नऊ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने जेरबंद केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्याकडून ११०९ काजुगराचे डबे आणि ५८ लाख सात हजारांची रोकड असा दोन कोटी २० लाख ३१ हजारांचा माल जप्त केला आहे. त्यातील ८५ शेतकºयांचे ७६८ काजूचे डबे आयुक्त फणसळकर यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात आले.
बनावट व्यापारी कंपनी स्थापन करून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर आणि कोकण परिसरातील शेतकºयांचा माल खरेदी करून त्यांचे पैसे न देता ही टोळी पसार झाली होती. याप्रकरणी ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने सुरुवातीला ४ डिसेंबर २०१८ रोजी गुजरात येथून दीपक पटेल याला अटक केली. त्यापाठोपाठ महेश ग्यानचंदानी ऊर्फ सुमितकुमार असनानी (४९, रा. कच्छ, गुजरात) याला ७ जून २०१९ रोजी, तर ११ जून २०१९ रोजी नारायणलाल माली (५१) आणि तुषार अग्रवाल (३६, मीरा रोड, ठाणे) यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून आशीष मेहता (३१, रा. भार्इंदर), दीपक राठोड (४३, मुंबई), महावीर राठोड (४३, रा. बोरिवली, मुंबई), किशोर गाला (५७, रा. बोरिवली) आणि किरण रांभीया (५३) या पाच जणांना २७ जून रोजी अटक केली. या टोळीने कोल्हापूर आणि कोकण परिसरातील शेतकºयांचा काजूचा माल खरेदी करून तो परस्पर विकला. या टोळीकडून आतापर्यंत ११०९ काजुगराचे डबे आणि १४६ काजूच्या डब्यांची ५८ लाख ७ हजारांची रोकड, लॅपटॉप बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, एक कार असा माल जप्त केला आहे.
८५ शेतकऱ्यांना मिळाले ७६८ काजूचे डबेकोल्हापूरच्या चंदगड भागातील मास्ती मरणहोळकर आणि मनसुर बेसरीकर यांच्यासह १९२ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यातील ८५ शेतकºयांचे प्रत्येकी सात हजार रुपये किमतीचे ५३ लाख ७६ हजारांचे ७६८ काजूचे डबे सोमवारी पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.