Join us  

Maharashtra Kesari: फडणवीसांनंतर महाविकास आघाडीकडूनही पै. पृथ्वीराज पाटीलला 5 लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 8:32 AM

पृथ्वीराजला दिवंगत महाराष्ट्र केसरी संजय पाटील आटकेकर यांच्या स्मरणार्थ १ लाखाच्या बक्षीसाचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.

मुंबई/कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने सातारा येथे आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesari) कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील (Pruthviraj Patil) याने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराज महाराष्ट्रभर झळकला. लाल मातीतलं पहिलं स्वप्नही पूर्ण झालं. मात्र, "मला केवळ मानाची गदा पारितोषिक देण्यात आले असून संयोजकांनी रोख रक्कम दिली नसल्याची खंत या पैलवानाने बोलून दाखवली होती. त्यानंतर, पृथ्वीराजवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. 

पृथ्वीराजला दिवंगत महाराष्ट्र केसरी संजय पाटील आटकेकर यांच्या स्मरणार्थ १ लाखाच्या बक्षीसाचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र चॅम्पियन आणि संजय पाटील यांचे बंधू धनाजी पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले. तर, भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर, महाविकास आघाडीनेही त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पृथ्वीराजला 5 लाख रुपयांचे बक्षीस देत असल्याचे जाहीर केले. तसेच, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या कै. शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टकडून 2 लाख रुपयांचा धनादेश, रक्षक प्रतिष्ठानकडून 1 लाक 51 हजारांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर, खासदार उदयनराजे भोसले यांच्याहस्ते जलमंदिर पॅलेस येथे नवीकोरी बुलेटही देण्यात येणार आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराज तालिम संघातर्फे ही बुलेट देण्यात येत आहे. 

शिवेंद्रराजेंकडून 5 लाखांचे बक्षीस

सातारा-जावळीचे आमदार व अजिंक्य उद्योगसमुहाचे प्रमुख शिवेंद्रराजे भोसले यांनी तातडीने पृथ्वीराजला सातारा- जावलीकरांच्यावतीने 5 लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे. महाराष्ट्र केसरी ही कुस्तीची अजिंक्यपद स्पर्धा सातार्‍यात आयोजित करण्यात आली होती. सातारा- जावलीकर म्हणून मी तातडीने माझ्यावतीने महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील यांना 5 लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर करीत आहे. ही रक्कम आम्ही तातडीने पृथ्वीराजला देत आहोत, असेही आमदार शिवेंद्रराजे यांनी जाहीर केले. 

टॅग्स :महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धादेवेंद्र फडणवीसमहाविकास आघाडी