Join us

महाराष्ट्राला माहितीय मी तंबाखु खात नाही; शंभुराजेंचा आदित्य ठाकरेंवरही निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 10:42 AM

मी गेल्या १५ वर्षांपासून सभागृहाचा सदस्य आहे, त्यामुळे सभागृहाचे नियम मला माहिती आहेत.

मुंबई - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, एक दिवस अगोदर सोशल मीडियावर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे सहकारी भरत गोगावले यांना सभागृहात दिलेली पुडी चर्चेचा विषय ठरली आहे. त्यावरुन, ठाकरे गटानेही मंत्री महोदयांवर निशाणा साधला. राज्य सरकारला या ना त्या विषयावरुन आणि शेतकरी प्रश्नावरुन विरोधकांनी चांगलंच घेरलंय. त्यात, मंत्री शंभुराजे देसाईंनी ऐन मुख्यमंत्री बोलत असताना आमदार भरत गोगोवले यांना पुडी दिल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला. याबाबत, आता मंत्री देसाई यांनी स्पष्टीकरण दिलंय.

मी गेल्या १५ वर्षांपासून सभागृहाचा सदस्य आहे, त्यामुळे सभागृहाचे नियम मला माहिती आहेत. सगळ्या महाराष्ट्राला माहितीय, मी तंबाखु खात नाही, ती मसाला इलायची पुडी होती, असे स्पष्टीकरण राज्याचे मंत्री शंभुराजे देसाई यांनी दिलं आहे. आम्ही सरकारची बाजू भक्कमपणाने मांडतो, त्यामुळे कुठले तरी विषय काढून आम्हाला बदनाम करण्यात येत आहे. मात्र, माझ्या मनाला माहितीय, मला माहिती आहे मी तंबाखुच खात नाही. तर, भरत गोगावले हेही तंबाखु खात नाहीत, असेही देसाई यांनी म्हटले. यावेळी, देसाईंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोलाही लगावला. 

एका युवा नेत्याने यावर प्रतिक्रिया दिली, तत्पूर्वी त्यांनी खात्री करायला हवी होती. युवा नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात बोलले का, कधी बांधावर गेले का?, गारपीट झाली पण एका बांधावर तरी ते गेले का? असे म्हणत शंभुराजे देसाईंनी आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटावर निशाणा साधला. 

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे

शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर मंत्री शंभुराजे देसाईंवर टीका केली होती. झाला प्रकार निंदनीय आहे, जो काही प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. हे कसले राज्यकर्ते, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणीच आदित्य यांनी केली होती.   

टॅग्स :शंभूराज देसाईआदित्य ठाकरेशिवसेनाविधानसभा