महारेरा नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 05:31 AM2018-09-20T05:31:45+5:302018-09-20T05:33:25+5:30
आतापर्यंत महारेरा अंतर्गत एकूण १७ हजार ४७४ प्रकल्पांची आॅनलाइन पद्धतीने नोंदणी झाली असून, १५ हजार ८९३ विक्रेता (एजंट)नी रजिस्ट्रेशन केलेले आहे.
मुंबई : घरखरेदी, गृहनिर्माण प्रकल्पात विकासक आणि संबंधितांकडून होणारी फसवणूक टाळण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या महारेरा कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. आतापर्यंत महारेरा अंतर्गत एकूण १७ हजार ४७४ प्रकल्पांची आॅनलाइन पद्धतीने नोंदणी झाली असून, १५ हजार ८९३ विक्रेता (एजंट)नी रजिस्ट्रेशन केलेले आहे, तर प्राधिकरणाने वर्षभरात ग्राहकांच्या २ हजार २६० तक्रारींचे आॅनलाइन निवारण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि ग्राहक-विकासक यांच्यामधील व्यवहार अधिक पारदर्शक बनविण्यासाठी स्थापन केलेल्या महारेरा प्राधिकरणाला वर्षभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला. महारेराकडे नोंदणी करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून, ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणात राज्याने देशभरात आघाडी घेतली. गृहनिर्माण प्रकल्पाशी संबधित सर्व प्रकराची परवानगी, नकाशे, सदनिकेची वैशिष्ट्ये, विकास कार्याचा आरखडा, विकासकाचा तपशील ही सर्व माहिती सदनिका खरेदीदाराच्या सोयीसाठी महारेराच्या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिली असून, ती दर तीन महिन्यांनी अद्ययावत करणे विकासकास बंधनकारक आहे.