लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर; राज्यात ३ कोटी पेक्षा जास्त लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:06 AM2021-06-26T04:06:21+5:302021-06-26T04:06:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणात तीन कोटींचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणात तीन कोटींचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. शुक्रवारी सायंकाळी सात पर्यंत राज्यात ३ कोटी २ लाख ७१ हजार ६०६ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात ४ लाख ८० हजार ९५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्र सुरूवातीपासून आघाडीवर होता. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास राज्याने लसीकरणाचा तीन कोटींचा टप्पा पार केला. तर, दिवसभरात साधारण ४ लाख ८० हजार लसींच्या मात्रा देण्यात आल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, वय वर्षे ४५ वरील लोकसंख्येनंतर आता १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे.
गुरूवारी रात्रीच्या आकडेवारीनुसार राज्यात २ कोटी ९७ लाख २३ हजार ६३७ लसीच्या मात्रा देण्यात आल्या होत्या. त्या पाठोपाठ २ कोटी ८९ लाख २२ हजार ६०५ मात्रांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर होता. याशिवाय गुजरात, राजस्थान, कर्नाटक, पश्चिम बंगाल येथील लसीकरणाने दोन कोटींचा टप्पा ओलांडला आहे.