विधान परिषदेच्या ११ जागांचा बिगुल वाजला; ‘क्रॉस व्होटिंग’ची शक्यता: काेणाला किती जागा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 05:36 AM2024-06-19T05:36:50+5:302024-06-19T05:39:49+5:30
१२ जुलैला मतदान; विजयासाठी २३ मतांचा कोटा निश्चित, सर्व पक्षांचा लागणार कस.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभेतील आमदारांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. कोणाच्या जागा जास्त येणार याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांत पडलेली फूट या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत किती आमदार कोणत्या गटात हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेतील भाजपचे ४, शिंदेसेना आणि उद्धवसेनेचा प्रत्येकी १, काँग्रेसचे २ तर अजित पवार गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येकी १ अशा एकूण ११ आमदारांची मुदत २७ जुलै २०२४ रोजी संपत आहे.
पक्षीय बलाबल
भाजप १०३
शिंदेसेना ३७
अजित पवार गट ३९
काँग्रेस ३७
उद्धवसेना १६
शरद पवार गट १३
बविआ ३
समाजवादी २
एमआयएम २
प्रहार २
मनसे १
माकप १
शेकाप १
स्वाभिमानी पक्ष १
रासप १
जनसुराज्य १
क्रां.शे.प. १
अपक्ष १३
एकूण २७४
काेणाला किती जागा मिळू शकतील?
- लोकसभेवर निवडून गेल्याने आमदारांचा राजीनामा, आमदारांचे निधन आणि अपात्रतेची कारवाई यामुळे विद्यमान विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ २८८ वरून २७४ वर आले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी २३ मतांचा कोटा असणार आहे.
- विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ लक्षात घेता भाजप आणि छोट्या मित्र पक्षांचे मिळून पाच, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात.
- काँग्रेसचा एक उमेदवार आरामात निवडून येऊ शकतो. पक्षांतर तसेच लोकसभेवर निवड यामुळे काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ ३७ वर आले आहे. परिणामी काँग्रेसने दुसरा उमेदवार दिला तर त्याला निवडून आणण्यासाठी समाजवादी, एमआयएम, माकप आदी पक्षांची मदत घ्यावी लागेल.
- उद्धवसेना आणि शरद पवार गट या दोघांचा मिळून एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपने सहावा उमेदवार दिला किंवा अपक्षाला पुरस्कृत केले तर विधान परिषदेची निवडणूक अटळ आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
अधिसूचना जारी : २५ जून
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची
मुदत : २ जुलै
उमेदवारी अर्जाची
छाननी : ३ जुलै
उमेदवारी अर्ज माघारीची मुदत : ५ जुलै
मतदान : १२ जुलै (सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत)
मतमोजणी : १२ जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून
‘क्रॉस व्होटिंग’ची शक्यता
- जेमतेम १५ दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विरोधात गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात अस्वस्थता आहे.
- शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाकडून सोडून गेलेले आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने कुंपणावर असलेले आमदार विरोधात मतदान (क्रॉस व्होटिंग) करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२७ जुलै २०२४ रोजी मुदत संपणारे आमदार
भाजप : विजय गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील I काँग्रेस : डॉ. वजाहत मिर्जा, डॉ. प्रज्ञा सातव I शिंदेसेना : डॉ. मनीषा कायंदे I उद्धवसेना : अनिल परब I अजित पवार गट : बाबाजानी दुर्राणी I रासप : महादेव जानकर I शेकाप : जयंत पाटील