Uddhav Thackeray: "मी म्हणतो विरोधकांनी रस्त्यावर उतराच, पण...", मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसमोर हातच जोडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 09:46 PM2021-04-02T21:46:43+5:302021-04-02T21:53:54+5:30

Uddhav Thackeray On Lockdown: राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भातील मुद्द्यावरुन विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला समाचार

maharashtra lockdown cm uddhav thackeray slams opposition | Uddhav Thackeray: "मी म्हणतो विरोधकांनी रस्त्यावर उतराच, पण...", मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसमोर हातच जोडले!

Uddhav Thackeray: "मी म्हणतो विरोधकांनी रस्त्यावर उतराच, पण...", मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसमोर हातच जोडले!

googlenewsNext

Uddhav Thackeray On Lockdown: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात येत नसला तरी कठोर निर्बंध लादले जातील आणि याची नियमावली दोन दिवसांत जाहीर केली जाईल, अशी महत्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पण मुख्यमंत्र्यांनी यासोबतच विरोधकांनी केलेल्या आरोपांचाही समाचार घेतला. (maharashtra lockdown cm uddhav thackeray slams opposition)

राज्यात कडक निर्बंध लादणार, दोन दिवसांत नियमावली जाहीर करू; मुख्यमंत्र्यांची माहिती

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाचं नाव न घेता विरोधकांनी लॉकडाऊनला विरोध करताना केलेली वक्तव्य थेट वाचून दाखवली. "राज्यातील विरोधी पक्षांना माझं हात जोडून आवाहन आहे की लोकांचे जीव आधी वाचले पाहिजेत. मग पुढचं बघू. लॉकडाऊनच्या विरोधात रस्त्यावर उतरू असं काही जण म्हणत आहेत. माझं विरोधकांना सांगणं आहे की रस्त्यावर उतरायचं आहे तर जरुर उतरा. पण लॉकडाऊनच्या विरोधात नव्हे, तर तो होऊ नये यासाठी प्रयत्न करा. आरोग्य यंत्रणा, डॉक्टर आणि नागरिकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा, लोकांना समजावण्यासाठी रस्त्यावर उतरा, घरोघरी जाऊन चाचण्या करायच्या आहेत त्यासाठी यंत्रणा अपुरी ठरतेय त्यांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा", अशी टीका मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर केली. 

जगाची माहिती देऊन विरोधकांच्या आरोपांची हवाच काढली
राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी जगातील परिस्थितीची माहिती वाचून दाखवली. ब्राझील, फ्रान्स, बल्गेरिया, रशिया मधल्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी देत तिथं लादण्यात आलेल्या कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत सांगून विरोधकांवर निशाणा साधला.  "देशाबाहेर कोरोनाची स्थिती भयंकर होत चालली आहे. अनेक ठिकाणी आजही लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादलेले आहेत. पण आपण राज्यातील जनतेचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन अद्याप तरी लॉकडाऊन केलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी कोरोनाचं राजकारण करू नये. उलट त्यांनी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांसाठी मदत करण्याची भूमिका घ्यावी", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

लॉकडाऊन नको मग पर्याय सुचवा
"राज्यात आपण आरोग्य सुविधा वाढवत आहोत. आजच्या घडीला सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत आणि संख्या येत्याही काळात वाढवण्यात येणार आहे. पण आरोग्य सेवा वाढवा म्हणजे फक्त फर्निचर वाढवून चालत नाही. त्यासाठी लागणारे डॉक्टर, नर्सेस आणि तज्ज्ञ मंडळी कुठून आणणार?", असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला. 

दोन दिवसांत कठोर नियमावली जाहीर करणार
मुख्यमंत्र्यांनी यावेळी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करत नसलो तरी इशारा देत आहे, असं सांगत येत्या दोन दिवसांत राज्यात नव्या निर्बंधांची नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. तसेच अशीच रुग्णवाढ सुरू राहिली तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यातील उपलब्ध आरोग्य संसाधनं कमी पडू लागतील आणि कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा थेट निर्वाणीचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे
 

Web Title: maharashtra lockdown cm uddhav thackeray slams opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.