Maharashtra Lockdown : 'नागरिकांच्या प्राणांचे रक्षण हिच आमची प्राथमिकता', अस्लम शेख यांच्याकडून लॉकडाऊनचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 06:04 PM2021-03-30T18:04:58+5:302021-03-30T18:14:29+5:30
Maharashtra Lockdown : मुंबईमध्ये सरकारी इस्पितळांमध्ये लसीकरण प्रभावीपणे चालू आहे अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.
मुंबई : मुंबईसहमहाराष्ट्रभरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशातच मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मलबार हिल येथील आपल्या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लोक नियमांचं उल्लंघन करत राहिल्यास व कोरोना रुग्णांच्या संख्येत अशा प्रकारे झपाट्याने वाढ होत राहिल्यास शेवटचा मार्ग म्हणून नाईलाजाने लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असे म्हटले आहे. (Maharashtra Lockdown: 'Protecting the lives of citizens is our priority', Aslam Sheikh hints at lockdown)
अस्लम शेख म्हणाले की, आम्ही क्रमाक्रमाने निर्बंध कडक करत आहोत. जनतेच्या हितासाठी आदर्श कार्यप्रणाली देखील आखून देण्यात आलेली आहे. नागरिकांच्या प्राणांचे रक्षण हिच आमची प्राथमिकता आहे. शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आदर्श कार्यप्रणालीचे नागरिकांनी कोटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मुंबईमध्ये सरकारी इस्पितळांमध्ये लसीकरण प्रभावीपणे चालू आहे अशी माहिती त्यांनी दिली.
'...तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा', मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
दरम्यान, महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक आणि गरीब वर्गामध्ये यामुळे काहीशी चिंता आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.