Join us

Maharashtra Lockdown Updates: हळूहळू बंद केल्यास लोक ऐकत नाहीत, त्यापेक्षा...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कडक लॉकडाऊनचेच संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 6:30 PM

Maharashtra Lockdown Updates: लवकरच संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा लॉकडाऊन ८ ते १५ दिवसांचा असू शकेल, असा अंदाज वर्तवला जातोय. 

मुंबईः कोरोनाच्या दुसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Goverment) काय पावलं उचलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज संपूर्ण लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ''हळूहळू गोष्टी बंद करून आपण प्रयत्न करून पाहिले. पण लोक ऐकत नाहीत. त्याऐवजी एकदम बंद करून हळूहळू गोष्टी सुरू केल्यास फायदा होतो'', हा आपला अनुभव असल्याचं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी संपादकांसोबतच्या बैठकीत केलं. 

कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण बघता, राज्यात कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही या बैठकीत व्यक्त केलं आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा लॉकडाऊन ८ ते १५ दिवसांचा असू शकेल, असा अंदाज वर्तवला जातोय. 

महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय झाल्यात जमा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यवासीयांशी संवाद साधला. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, एक-दोन दिवसांत कडक निर्बंध लागू करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. लॉकडाऊन हा उपाय नाही, पण दृश्य स्वरूपात बदल दिसले नाहीत आणि काही वेगळा उपाय मिळाला नाही, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. आरोग्य सुविधा वाढविणे म्हणजे फर्निचरचे दुकान नाही. सुविधा वाढविल्या तरी डॉक्टर आणि नर्सेस कुठून आणणार, त्याचा पुरवठा सल्ला देणारे करणार आहेत का, असा थेट सवाल त्यांनी केला होता. 

"हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची आधी सोय करा मगच लॉकडाऊनचा विचार करा" 

या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटल्याप्रमाणे, उद्धव ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञांशी चर्चा केली. राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी लॉकडाऊन अटक असल्याचेच संकेत दिले. अन्य राज्यांमध्ये काय सुरू आहे यावर मी बोलणार नाही, मला महाराष्ट्रातील जनतेचा जीव मोलाचा आहे, असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट सांगितलं. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखही उपस्थित होते. यावेळी संपादकांनीही कोरोना साखळी तोडण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यावर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्य सरकार कुठलेही आकडे लपवत नाहीए, सर्व खरी माहिती दिली जात आहे, माध्यमांनीही जनजागृती करून कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये याआधीच कडक निर्बंध

राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये याआधीच जिल्हापातळीवर लॉकडाऊन संदर्भातील कडक नियम लागू करण्यात आले आहेत. पुण्यात आजपासून अंशत: लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर बीड, अमरावती, बुलढाणा, सोलापूरमध्येही कडक नियमांची तर काही ठिकाणी विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र दिसून आल्यानं आता अधिकृतरित्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरलेला नसल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यातील आकडेवारी चिंताजनक

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल ४७ हजार ८२७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर २४ हजार १२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे.

मुंबईत तर कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतच्या नवीन उच्चांकाची नोंद शुक्रवारी झाली आहे. एका दिवसात तब्बल ८८३२ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण वाढतच असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा आता ५८ हजार ४५५ वर पोहोचला आहे. परिणामी, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ४६ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.४६ टक्के आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमहाराष्ट्रकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार