मुंबई - महायुतीत असताना भाजपला टेन्शन नव्हते. मात्र, भाजपला उमेदवार मिळत नाहीत, तसेच ही लढाई महाराष्ट्र हित विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी लढाई सुरू असून आम्ही महाराष्ट्र हिताच्या बाजूने असल्याचे मत माजी पर्यावरणमंत्री आणि उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. उत्तर पूर्व मुंबईतील मतदारसंघात विक्रोळीत आयोजित केलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यान ते बोलते होते.
उत्तर पूर्व मुंबईतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या जनसंवाद यात्रेला विक्रोळी विभागातून सुरुवात झाली. पाटील दहा वर्षे दिल्लीपासून दूर होते. आता पुन्हा जाणार असा विश्वास देत, आदित्य ठाकरे म्हणाले की, आमच्या पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार घोषित झाले आहेत आणि त्यांचा प्रचारही सुरू केला आहे. मात्र, एनडीएत भांडणे सुरू झाली आहेत. मुंबईत उमेदवारही मिळत नाहीत. जे महाराष्ट्राचा हिताचा विचार करणारे, लढणारे आहेत, ते आमच्यासोबत आहेत. गेल्या दोन वर्षांत एका विशिष्ट राज्यात सर्व उद्योग पाठविले जात आहेत. त्या विरोधात आम्ही नक्कीच आहोत. आमच्या हक्काचे दुसऱ्या राज्यात जाते, त्याचा राग आम्हाला येतो, यासाठी आम्ही दिल्लीत जाणार आहोत.
मुंबईकरांच्या मुळावर येणाऱ्या भाजपला दूर करणे गरजेचे असल्याचे म्हटले. भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यावरही टीका केली. स्ट्रीट फर्निचर घोटाळा आम्ही काढला आणि भाजप उमेदवाराने क्रेडिट घेतला. एवढंच नाही, तर कोटेचा यांनी सभागृहाला हे कंत्राट रद्द झाल्याची खोटी माहिती दिली, असा आरोप त्यांनी केला.