सगळेच नेते प्रचारात कमालीचे बिझी, काय खातात, कधी उठतात, त्यांच्या ‘स्टॅमिना’चे रहस्य काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 09:39 AM2024-04-06T09:39:10+5:302024-04-06T09:39:17+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढत आहे, तसाच तापमानाचा पाराही अनेक ठिकाणी ४२ पार गेला आहे. सर्वच पक्षांचे मोठे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढत आहे, तसाच तापमानाचा पाराही अनेक ठिकाणी ४२ पार गेला आहे. सर्वच पक्षांचे मोठे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. सकाळपासून रात्री एक-दोन वाजेपर्यंत निवडणुकीच्या रणनीतीबाबत विविध आघाड्यांवर काम करताना हे नेते थकत कसे नाहीत? हे नेते खातात काय? झोपतात कधी अन् उठतात कधी? असे अनेक प्रश्न तुम्हा-आम्हाला पडू शकतात. लोकांच्या मनात या नेत्यांविषयी बरेच कुतुहल असते. सर्वच राजकीय पक्षांच्या या प्रमुख नेत्यांचे रुटीन हे चक्रावून टाकणारे असते.
फडणवीस एकदाच जेवतात
संतुलित आहार, शक्यतो खाण्याच्या वेळा पाळणे, नाश्ता, जेवणात किमान सहा तासांचे अंतर ठेवणे अशी काळजी सगळेच नेते घेतात. देवेंद्र फडणवीस सकाळी ११ ला नाश्ता करतात आणि रात्री एकदाच जेवतात. गेले काही महिने त्यांचे हेच रुटीन आहे. सकाळी लवकर उठून कुठे जायचे असेल तर पाच-साडेपाचलाही उठतात. एरवी ७ ला उठून ते ८ ला तयार असतात मग रात्री झोपायची ठरलेली वेळ कधीही नसते. व्यायामासाठी नेत्यांकडे वेळ नाही. त्यांच्यासोबत सतत वावरणाऱ्या व्यक्ती सांगतात की, साहेबांना ते शक्य नाही होत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार घेणे आणि आहारावर नियंत्रण हा फंडा सोईचा आहे.
उद्धव ठाकरेंचा खानसामा सोबतच
उद्धव ठाकरेंसोबत त्यांचा खानसामाही असतो. ज्या हॉटेलमध्ये ते थांबतात तेथील किचनमध्ये जाऊन तो खानसामा जेवण बनवतो. वरणभात, उकडलेले पदार्थ, उकडलेल्या भाज्या घातलेले सँडविच, चिकन असे त्यांच्या नाश्ता, जेवणामध्ये असते. ते तेलकट अजिबात खात नाहीत. पथ्य पाळतात.
आठ पायऱ्या अन् पवार साहेब
शरद पवार परवा वर्धेला अमर काळेंचा अर्ज भरायला गेले होते. काळेंनी रथ बनविला होता. त्याला बऱ्यापैकी उंच आठ पायऱ्या होत्या. पवार यांचे पीए शिंपी यांनी माजी मंत्री अनिल देशमुखांना सांगितले की, एवढ्या पायऱ्या चढून साहेब रथावर जाणार नाहीत. अनिलबाबूंनी साहेबांना हे सांगितले, साहेबांनी फारसे लक्ष दिले नाही. साहेब गेले आणि भरकन पायऱ्या चढून रथावर विराजमान झाले. तेव्हा सगळे चाट पडले.
पटोले आईचे ऐकतात
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीच फिटनेस सांभाळतात अन् त्यासाठी मर्यादित खाणे हे त्यांचे मुख्य सूत्र असते. अगदी सकाळीही घरून निघाला तरी खाऊन निघायचे हा आईचा उपदेश ते आजही पाळतात.
पायाला भिंगरी, भेटीगाठी अन् बैठका
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेही निशाचर आहेत. दररोज रात्री एक-दीडला झोपतात. निवडणुकीच्या काळातही वेळ रात्री तीन-साडेतीनपर्यंतची असते. वयाच्या ८२ व्या वर्षी शरद पवारांचा स्टॅमिनाही अफलातून आहे.
- तब्येतीच्या मर्यादा असूनही उद्धव ठाकरे यांनी भर उन्हात सभांचा तडाखा लावला
आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एरवीही पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरतात.
- फडणवीस, बावनकुळे दररोज किमान हजार-बाराशे मेसेजेसना उत्तर देतात, दोनअडीचशे जणांशी तरी फोनवर बोलतात. भेटीगाठी, बैठका असे दिवसभर सुरू असते.