मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपल्याला आपल्या वडिलांची उणीव प्रकर्षाने जाणवली. पण घटकपक्षांतील सहकाऱ्यांनी साथ दिल्यामुळे सर्वकाही शक्य झाले, अशी भावना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आज सकाळी मतदानाला निघताना पत्रकारांकडे व्यक्त केली. याठिकाणी त्यांचा थेट सामना शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याशी आहे.
कीर्तिकर यांनी सकाळी पहाडी शाळा नं.१ पहाडी रोड, पेरू बाग, जयप्रकाश नगर, गोरेगाव पूर्व येथे पत्नी सुप्रिया सह मतदानाचा हक्क बजावला.
अमोल कीर्तिकर म्हणाले की, गतवर्षभरातील राजकारण पूर्णतः वेगळे होते. मी राजकारणात आल्यामुळे 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी असे वातावरण केव्हाच पाहिले नव्हते. अनेक लोक आम्हाला सोडून गेले. ही वस्तुस्थिती स्वीकारणे अवघड होते. पण आम्ही ती स्विकारली. अखेर आम्ही आमच्यासोबत जे उरले त्यांच्या मदतीने काम केले.
गेल्या दोन टर्मपासून माझे वडील खासदार गजानन कीर्तिकर हे या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार होते. तेव्हा ते उमेदवार म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मी त्यांना पाठीमागून सपोर्ट करत होतो. पण यावेळी मला दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. त्यामुळे निश्चितच माझी दमछाक झाली. पण वडील सोबत नसले तरी त्यांच्या अनुभवाचे, मायेचे व महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे लोक माझ्या मागे उभे होते. त्यामुळे आमचा विजय नक्की होईल, असेही कीर्तिकर यावेळी म्हणाले.
यावेळी अमोल यांना निवडणुकीच्या रणधुमाळीत तुम्हाला वडिलांनी काही सल्ला दिला का? असा प्रश्न केला असता त्यांनी नकारार्थी प्रत्युत्तर दिले. आमच्या घरी राजकीय चर्चा होत नाही.
मी माझ्यासोबत असणाऱ्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन प्रचार केला. वडील-मुलगा आणि मुलगा -आईचे नाते वेगळे असते. तुम्ही काहीही केले तर आई-वडिलांचे मुलांवर प्रेमच असते. तुम्ही दाखवा किंवा न दाखवूी नका ही निसर्गाची देणगी आहे, असेही अमोल कीर्तिकर यावेळी म्हणाले.