लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहेत. त्यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबईमध्ये महायुती विरुद्ध ठाकरे गट अशी मुख्य लढत असून, मुंबईत मतदान सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. आशिष शेलार यांनी मुंबईतील लोकसभा निवडणुकीतून पळ काढला, असं विधान अंबादास दानवे यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये ठाकरे गटाचा खालून पहिला नंबर येईल, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं. दानवे म्हणाले की, आशिष शेलार हे मैदानातून पळून गेले. त्यांना लोकसभा निवडणूक लढवा, असे पक्षाचे नेते सांगत होते. परवा एका मुलाखतीत विनोद तावडे यांनीही आशिष शेलार यांना लोकसभा निवडणूक लढा म्हणून सांगण्यात आलं होतं, असं विधान केलं होतं. असा मैदानातून पळून गेलेला माणूस कुणाचा खालून पहिला नंबर येईल आणि कुणाचा वरून पहिला नंबर येईल, हे काय सांगणार, आता तुमचा खालून किती नंबर येतोय हे तुम्ही बघा, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.
दरम्यान, आज मुंबईत होत असलेल्या मतदानामध्ये महाविकास आघाडीकडून चार मतदारसंघात ठाकरे गट निवडणूक लढवत आहे. या चार मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात ठाकरे गटाची गाठ भाजपाची पडली आहे. तर तीन मतदारसंघांमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होत आहे. तसेच दोन मतदारसंघांमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत होत आहे.