- श्रीकांत जाधव मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबईत सहा मतदारसंघांत सोमवारी मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक यंत्रणेने मतदारांना ‘आपले मत मनात नको राहायला... विसरू नका मतदान करायला’ असे आवाहन केले आहे.
मतदान केंद्रावर मोबाइलला बंदीमतदान केंद्रावर जाताना मोबाइल घेऊन जाऊ नये. तसेच स्वीच ऑफ मोबाइलसुद्धा सोबत ठेवता येणार नाही. कुटुंबासह जाणार असाल तरीही एका व्यक्तीला मोबाइल सांभाळत बाहेर बसावे लागेल.
१२ पैकी एक पुरावा ठेवा सोबतमतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, कामाचे छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपालाचे पासबुक, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड, मनरेगा रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाचे दस्तावेज, दिव्यांगांचे विशेष ओळखपत्र सोबत ठेवा.
मत दिल्यावर येईल ‘स्लिप’बॅलेट बॉक्समध्ये दर्शविलेल्या यादीपैकी तुमच्या उमेदवारासमोर बटन दाबल्यानंतर ७ सेकंदांत तुमची स्लीप पाहता येईल. ती पाहून स्वतःच्या मताची खात्री करून घ्या.
पक्ष आणि उमेदवारांचे साहित्य नकोमतदान केंद्रावर जाताना खिशाला एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह किंवा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा फोटो, चिन्ह लावू नये. गळ्यात राजकीय झेंडा किंवा शेला घालू नये. राजकीय संदेशाचे टी-शर्ट किंवा साडी, ड्रेस घालू नये.
बूथवर मिळवा स्लिपनोंदणीकृत मतदारांचे मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीची ‘व्होटर स्लिप’ निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. तसेच राजकीय पक्षांनी वितरित केली आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला स्लीप मिळाली नसेल तर आपल्या घराजवळील बूथवर जाऊन स्लिप मिळवा.
आपले मत गुप्त ठेवाभारतीय निवडणूक प्रक्रियेत गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य आहे. तेव्हा मतदारांनी मतदान केल्यानंतर आपले मत गुप्त ठेवावे. तसेच त्यावर चर्चा करणे टाळावे. व्होटिंग बूथमध्ये कोणतेही इलेक्ट्राॅनिक किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाऊ नयेत. लहान मुलांना सोबत घेणे टाळावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.