गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 08:05 PM2024-05-23T20:05:49+5:302024-05-23T20:10:46+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठीचं मुंबईतील मतदान आटोपल्यानंतर गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी मागच्या काही दिवसांमध्ये केलेल्या विधानांमुळे शिंदेगटात खळबळ उडाली असून, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही गजानन कीर्तिकर यांच्याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये वादांना तोंड फुटलं आहे. या वादाचे केंद्र ठरले आहेत ते मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे मावळते खासदार गजानन कीर्तीकर. कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी ठाकरे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे या निवडणुकीत उघडपणे मुलाला पाठिंबा द्यायचा की पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा प्रचार करायचा अशा द्विधा मनस्थितीत गजानन कीर्तीकर सापडले होते. दरम्यान, मतदान आटोपल्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी मागच्या काही दिवसांमध्ये केलेल्या विधानांमुळे शिंदेगटात खळबळ उडाली असून, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गजानन कीर्तिकर यांच्याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
एकनाथ शिंदे गजानन कीर्तीकर यांच्याबाबत म्हणाले की, गजानन कीर्तीकर यांनी काल माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांचं माझ्याशी बोलणं झालेलं आहे. त्यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आता त्या पुढे काय करायचं याबाबतचा निर्णय पक्ष घेईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, मागच्या काही दिवसांत गजानन कीर्तीकर यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत असलेले पुत्र अमोल कीर्तीकर अनेक विधानं केली होती. अमोलचं बोट धरुन मी त्याला शिवसेनेत आणलं नाही, तो कष्ट करुन आला आहे. अमोल प्रमाणिक आहे. त्याच्यासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो, याची खंत कायम राहील असे गजानन कीर्तीकर म्हणाले होते. त्यानंतर शिंदे गटातील नेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. तर मुंबई उत्तर पश्चिममधील लढत बिनविरोध करण्याचा कीर्तीकर यांचा डाव होता, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता. त्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर जिंकले काय आणि हरले काय, यात माझा काय दोष? मतदार जे ठरवतात, ते होईल. पण अमोल जिंकला तर मला वडील म्हणून नक्कीच आनंद होईल, असं विधान करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली होती.