- मनोहर कुंभेजकरमुंबई - ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर आता पार्ल्यात मराठी व गुजराथी वाद पेटला आहे.मराठी माणसांना घर नाकारल्याच्या तक्रारी वरून आज विलेपार्ले उद्धव सेनेने संबंधित बिल्डरचा तीव्र निषेध करत त्याच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन छेडले.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की,विलेपार्ल्यातील काही बिल्डर्स घरांची चौकशी करतांना मराठी ग्राहकांना तुम्ही व्हेज का नॉन व्हेज खाता अशी विचारणा करतात,जर नॉन व्हेज खातात याची खातरजमा केल्यावर मग मराठी माणसांना घर देताना किंमत वाढत वाढवून सांगतात.नॉनव्हेज खाणार असाल तर घर मिळणार नाही असा अनुभव उद्धव सेनेच्या महिला विधानसभा समन्वयक जुईली शेंडे यांना आला.त्यांनी तात्काळ उद्धव सेनेच्या शिवसेना शाखेशी संपर्क केला.
त्यांच्या तक्रारीची दखल घेत शिवसेना नेते,आमदार अँड. अनिल परब यांच्या सूचनेनुसार विलेपार्ले विधानसभा संघटक संदीप नाईक व नितीन डिचोलकर,महिला विभाग संघटक रुपाली शिंदे,शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ, अनिल मालप सिद्धेश पवार, पोपट बेदरकर, आनंद पाठक यांनी ऑर्किड बिल्डर अमित जैन यांच्या ऑफिसवर धडक मोर्चा काढून घेराव घातला. त्यांना निवेदन देण्यात आले. यापुढे मराठी माणसां बरोबर जर व्हेज नॉनव्हेजचा विषय केलात शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा दिल्याचे नितीन डिचोलकर यांनी लोकमतला सांगितले.तर यापुढे फ्लॅट देतांना आम्ही भेदभाव करणार नाही असे आश्वासन बिल्डर अमित जैन यांनी उद्धव सेनेला दिल्याची माहिती त्यांनी दिली.