मविआचा उमेदवार ठरेना, महायुतीच्या पीयूष गोयलांनी मतदारसंघही पिंजून काढला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 04:14 PM2024-04-28T16:14:17+5:302024-04-28T18:08:33+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: एकीकडे महायुतीकडून पीयूष गोयल यांना उमेदवारी जाहीर झालीये, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवारही अद्याप ठरत नाहीये. यातच आता पीयूष गोयल यांनी मतदारसंघात आपला संपर्क वाढवण्यास सुरुवात केलीये.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झालीये. पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान नुकतंच पार पडलं. त्या ठिकाणच्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. विद्यमान खासदार गोपळ शेट्टी यांचा उत्तर मुंबईचा मतदारसंघ हा देखील सध्या चर्चेचा विषय ठरतोय. यावेळी गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीये. मराठी, गुजराती तसंच उत्तर भारतीय असे सर्वच मतदार या मतदारसंघात आहेत.
एकीकडे महायुतीकडून पीयूष गोयल यांना उमेदवारी जाहीर झालीये, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवारही अद्याप ठरत नाहीये. यातच आता पीयूष गोयल यांनी मतदारसंघात आपला संपर्क वाढवण्यास सुरुवात केलीये. आज सकाळी सकाळीच मॉर्निग वॉकसोबत पोयसर जिमखान्यात पीयूष गोयल यांनी नागरिकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत आणि मोदींचा असाच आशीर्वाद राहिला तर लवकरच मुंबईत जागतिक स्तरावरच्या पायाभूत सुविधा तयार केल्या जातील, असंही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून पीयूष गोयल यांनी नागरिकांशी संपर्क वाढवण्यास सुरूवात केलीये. मतदारसंघातील बहुतांश इमारतींमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्याही जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याद्वारे केला जातोय. आतापर्यंत मतदारसंघात दीडशेपेक्षा अधिक मेळाव्यांना त्यांनी उपस्थिती लावलीये. उत्तर भारतीयांचा मेळावा, महायुती, जैन धर्मियांचा, प्रल्हाद पै यांच्या जीवन विद्या मिशनचे मेळावे, महिलांचे मेळावे असे अनेक मेळावे मतदारसंघात पार पडलेत. याशिवाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले, चित्रा वाघ, आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते.
निवडणूक रथाला हिरवा झेंडा
पीयूष गोयल यांनी शनिवारी निवडणुकीच्या प्रचार रथाला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी या रथाची पूजा करुन रथ रवाना केला. यावेळी त्यांनी जनता आपल्यासोबत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सेवक म्हणून काम करण्याची प्रेरणा दिल्याचंही त्यांनी म्हटलंय. आमदार योगेश सागर यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून, तर माजी नगरसेवक बाळा तावडे यांच्याकडे चारकोप विधानसभा क्षेत्राची जबाबदारी भाजपकडून सोपवण्यात आलीये.