मुंबई - मी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केले असे सांगणारे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिथे राहतात त्या बुथवर मात्र काँग्रेसचा म्हणजेच महाविकास आघाडीचा उमेदवार पिछाडीवर आहे. मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान आहे. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडणूक रिंगणात होत्या. त्यांच्याविरोधात भाजपकडून ॲड. उज्ज्वल निकम हे उमेदवार होते.
वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर-मध्यची लढाई जिंकली. मात्र, ठाकरेंनी ज्या बुथवर मतदान केले, तिथे मात्र गायकवाड यांच्यापेक्षा निकम यांना जास्त मते मिळाली आहेत. ठाकरे जिथे राहतात त्या बुथ क्रमांक २५५ वर एकूण १,२६७ मतदार आहेत. यापैकी यावेळच्या लोकसभा निवडणुकीत ६३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना ४२० इतके (६५ टक्के) मतदान झाले. तर वर्षा गायकवाड यांना २०२ (३१ टक्के) इतके मतदान झाले आहे.
धारावीत अनिल देसाईंना भरघाेस मतेवर्षा गायकवाड यांनी मात्र आपल्या धारावी या मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांना भरघोस मतांची आघाडी दिली आहे. मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघातून गायकवाड यांच्या धारावी मतदारसंघातून देसाई यांना तब्बल ६७,६७७ मते मिळाली असून इथून देसाई यांना ३७,१५७ मतांची आघाडी मिळाली आहे.