- मनोहर कुंभेजकरमुंबई - उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेतून जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी राज्यमंत्री वायकर यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे.त्यांनी महायुतीतील कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी आणि मतदारसंघाची जुळवाजुळव सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार वायकर त्यांच्या जोगेश्वरी पूर्व श्याम नगर तलावा जवळील सेवालय कार्यालयात तर कधी मातोश्री क्लब मध्ये रोज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका भेटी गाठी सुरू झाल्या आहेत.
वायकर यांनी प्रचाराची तयारी सुरू केली असली तरी ते निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत अजिबात नाहीत. अजूनही दुसरा उमेदवार तयार करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली असंल्याची माहिती सूत्रांनी दिली.काल रात्री वायकर यांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे समजते.
वायकर यांनी 50 वर्षे शिवसेनेत घालवली.तसेच ठाकरे कुटुंबाचे त्यांचे अनेक वर्षे असलेले घनिष्ठ संबंध लक्षात घेता ते उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात निवडणूक कशी लढवायची या द्विधा मनस्थितीत आहेत. वायकर यांची मनस्थिती चक्रव्ह्यूवात अडकलेल्या अभिमन्यू सारखी झाली असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.विशेष म्हणजे अमोल कीर्तिकर यांना मातोश्रीत वायकर यांनीच नेले होते आणि उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी द्यावी अशी विनंती त्यांनी केली होती.
वायकर यांनी दि,10 मार्च रोजी शिंदे सेनेत प्रवेश केला होता.त्यापूर्वी मातोश्री क्लबच्या 500 कोटींच्या प्रकरणी पालिकेने न्यायालयात हमीपत्र दिल्यावर त्यांचा मागे इडीचा ससेमिरा काही प्रमाणात कमी झाला असला तरी अजून ईडीने त्यांची केस मागे घेतली नाही.त्यांच्या वर उमेदवारी साठी दबाब असून जर उमेदवारी घेतली नाही तर अजून दीड ते दोन वर्षे इडी त्यांना नाहक त्रास देईल.त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.