Join us

‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 3:45 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: शिवाजी पार्कवरील सभेवरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मनसेवर टीका केली होती. त्या टीकेला मनसेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालेली आहे, अशी टीका मनसे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे.

मुंबईतील राजकारणात महत्त्वाचं केंद्र असणाऱ्या शिवाजी पार्कवरील सभेवरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने आले आहेत. १७ मे रोजी शिवतीर्थावर सभेसाठी मनसेने अर्ज केला आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक जाहीर झाली तेव्हाच येथे सभा घेण्याची तयारी केली होती. यामुळे हे मैदान कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवरील सभेवरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मनसेवर टीका केली होती. त्या टीकेला मनसेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालेली आहे, अशी टीका मनसे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे.

शिवाजी पार्कवरील सभेवरून मनसे आणि ठाकरे गट आमने-सामने आले असताना येथील सभेवरून अनिल परब यांनी मनसेवर टीका केली होती. मागच्या सभेत राज ठाकरेंनी  मी इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही, असे  सांगितले होते. मात्र आता लोकसभेचा उमेदवार नसताना सभा कुणाची पोरं कडेवर खेळवणार आहात? असा सवाल ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांनी विचारला होता. 

त्याला आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोसल मीडियावरून उत्तर दिलं आहे. ‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालेली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या तालावर नाचकाम करणाऱ्या लोकांना शिवाजी पार्क मैदान सभेसाठी मिळत नसेल तर त्यामध्ये राजसाहेबांना आणायची काहीच गरज नाही. तुम्हाला नाचता येत नाही हे कबूल करा, अंगण वाकडे म्हणून उगाच भोकाड पसरू नका, असा टोला अमेय खोपकर यांनी लगावला आहे.  

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मनसेराज ठाकरेउद्धव ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४