Join us

'मोदींचे हात बळकट करण्यासाठी रवींद्र वायकर यांना मतदान करा', एकनाथ शिंदेंचं आवाहन

By मनोहर कुंभेजकर | Published: May 14, 2024 6:47 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत म्हणजे विकासाला मत,देशाच प्रगतीला मत,महासत्तेला मत आहे.त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना आपण दिलेले मत हे मोदींना मिळणार आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत म्हणजे विकासाला मत,देशाच प्रगतीला मत,महासत्तेला मत आहे.त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना आपण दिलेले मत हे मोदींना मिळणार आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी वायकर यांना मतदान करा असे आवाहन मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना  शिंदे सेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री दिंडोशीत केले.

वायकर यांच्या प्रचारार्थ संकल्प सहनिवस,नागरी निवारा परिषद,आयटी पार्क येथे आयोजित महायुतीच्या जाहिर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. वायकर यांच्या मागे इडी लागल्यावर त्यांच्या मागे पक्षप्रमुख उभे राहिले नाही.त्यांना आधार दिला नाही.तुम्ही तुमचे बघा असे सांगत त्यांना वाऱ्यावर सोडले.वायकर माझ्याकडे आले.आमच्या मधील जे गैरसमज ज्यांनी केले होते, ते दूर झाले.त्यांच्या कडून मी माहिती घेतली,आणि त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा राहिलो असे मुख्यमंत्री म्हणाले.

या मतदार संघात अमित साटम,डॉ.भारती लव्हेकर, विद्या ठाकूर आणि स्वतः वायकर असे चार आमदार असून हा महायुतीचा बालेकिल्ला आहे.वायकर यांनी तीन वेळा आमदारपद भूषवले असून मी त्याचा साक्षीदार आहे.त्यांनी जोगेश्वरीचा विकास केला असून त्यांना या लोकसभा मतदार संघाचा विकास करायचा आहे,त्यामुळे निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.

एकवेळ माझे दुकान बंद करेन,पण माझी काँग्रेस होवू देणार नाही.भ्रष्टाचारी काँग्रेसला गाडा असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे,मात्र ते गेल्यावर शिवसेनेत मतलबी वारे वाहू लागले,त्यांनी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आणि उबाठाची काँग्रेस झाल्याची टिका त्यांनी केली. कॉंग्रेसच्या दावणीला असलेले त्यांचे सरकार आम्ही बदलले.गेल्या दोन वर्षात मुंबई बदलेली आहे.दोन वर्षात खड्डे नाही,मेट्रो,कोस्टल रोड,अटल सेतू असे अनेक प्रकल्प  मार्गी लावणारे आणि काम करणारे आमचे महायुतीचे सरकार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी रवींद्र वायकर म्हणाले की,दंगलग्रस्त जोगेश्वरीची ओळख बदलून सर्वांगिण विकास केला.पालिकेत चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष असतांना तोट्यातील पालिका फायद्यात आणली.मध्य वैतरणा धरण आपल्या काळात बांधल्याने मुंबईकरांना 950 एमएलडी जास्त पाणी उपलब्द्ध झाल्याने मुंबईकरांना प्रत्येकी 135 लिटर पाणी उपलब्ध झाले.जोगेश्वरी येथे ट्रामा सेंटर बांधले.जोगेश्वरीत पूल बांधला. त्यामुळे गेल्या 35 वर्षातील लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेली अगणित कामे हाच माझा ब्रँड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार अमित साटम,आमदार डॉ.भारती लव्हेकर,आमदार विद्या ठाकूर,आमदार राजहंस सिंह,माजी मंत्री व रासपाचे महादेव जानकर यांची भाषणे झाली.यावेळी माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.प्रस्तावना शिंदे सेनेचे दिंडोशी विधानसभा संघटक वैभव भरडकरयांनी केली.यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई उत्तर पश्चिमएकनाथ शिंदेरवींद्र वायकरलोकसभा निवडणूक २०२४