बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By मनोहर कुंभेजकर | Published: May 7, 2024 05:04 PM2024-05-07T17:04:14+5:302024-05-07T17:05:17+5:30
Maharashtra lok sabha election 2024 : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या सर्वपक्षीय समन्वय बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोरेगाव पूर्व,नेस्को संकुलात संपन्न झाली.
मुंबई - बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत असे ठाम प्रतिपादन शिंदे सेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री गोरेगावात केले.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या सर्वपक्षीय समन्वय बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोरेगाव पूर्व,नेस्को संकुलात संपन्न झाली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की,आता मजबूर भारत नाही तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत भारत आहे.आपले सरकार नारीशक्तीचा सन्मान करणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. मनात कुठलाही अहंकार व इगो न ठेवता आपल्याला मिळालेल्या सत्तेचा वापर गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी केला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज जसे मातृशक्तीचा आदर करायचे. त्याप्रमाणे आपले सरकार महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या काळात प्रकल्पांमध्ये खुट्टा टाकून ठेवला होता. तो काढून आम्ही प्रकल्पांमधील स्पीड ब्रेकर हटविले. आरे कारशेडच्या कामावरील बंदी हटविली. आरे कारशेड केले नसते तर आपण दहा वर्षे मागे गेलो असतो. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १० हजार कोटी अधिक लागले असते. बालहट्ट आणि अहंकार यामुळे यापूर्वीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाने राज्याचे नुकसान झाले, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
यावेळी रवींद्र वायकर म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जी कामे केले आहे ते जनतेपर्यंत महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोहोचवावीत.आपल्याला महाराष्ट्राचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेत जायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांनी आपली संपूर्ण ताकद शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिंदे सेनेचे खासदार गजानन कीर्तिकर, अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमित साटम, गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर,वर्सोव्याच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर,माजी खासदार संजय निरुपम,माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत आणि महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.