मुंबई - उत्तर–पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आपल्या वचननाम्यात मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे नमूद केले आहे. त्या शिवाय महाविकास आघाडी आणि उद्धव सेनेचा वचननामा पूर्ण करण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी प्रसिध्द केलेल्या वचननाम्यात म्हटले आहे.
यामध्ये प्रामुख्याने रेल्वे प्रवासी संघाचे प्रलंबित प्रश्न, वन जमिनीवरील रहिवाश्यांच्या पुर्नविकासाचा प्रश्न, जोगेश्वरीतील गुंफा संवर्धन, वर्सोवा कोळीवाडयाचे प्रलंबित प्रश्न, कोळीवाडयाच्या पुर्नविकासासाठी विकास नियंत्रण नियमावली, त्याशिवाय वर्सोवा – लोखंडवाला परिसरात कायमचे टपाल कार्यालये आदी प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
वचननाम्यातील इतर काही महत्वाचे मुद्दे
वर्सोवा कोळीवाड्यातील मच्छीमारबांधवांना डिझेलचे परतावे त्वरीत मिळवून देण्यासाठी आणि कोळीवाडयाचे सीमांकन करण्यासाठी पाठपुरावा करणार, अधेरी पूर्व येथील कामगार रुग्णालय अद्यायावत करण्यासाठी प्रयत्न करणार, समर्थ नगर – लोखंडवाला – यारी रोड याविभागासाठी नवीन अग्निशमन केंद्राची उभारणी करणार,हृदयरोग, कँन्सर सारख्या दुर्धर आजारांवर अल्पदरात उपचार मिळण्यासाठी ‘एम्स’ च्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालयाची उभारणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार, संजय गाधी राष्ट्रीय उद्यानातील बाधीत झोपडपट्टीधारकांचे पुर्नवसन करणार,केंद्र व राज्य सरकारच्या स्वयं रोजगार व अन्य लोकाभिमुक योजना मतदारसंघात राबवणार,मतदारसंघातील अनेक जुन्या इमारती व झोपडपटया जाचक अटींमुळे आणि अंतर्गत वादामुळे त्यांची पुर्नवसनाचे प्रकल्प रखडले आहेत,त्यातील अडथळा दूर करुन पुर्नवसनासाठी योग्य तो पाठपुरावा करणार, मतदारसंघातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस विभागाशी समन्वय साधणार, कबड्डी व शरीर सौष्ठवसारख्या खेळांसाठी मतदारसंघामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यायावत क्रीडा संकुल उभारणार आदी त्यांच्या वचननाम्यात महत्वाचे मुद्दे असल्याचे अमोल कीर्तिकर यांनी लोकमतला सांगितले.