- संताेष आंधळेमुंबई - मनसे पक्ष लोकसभा मतदार संघात केवळ महायुतीच्या प्रचारासाठी उतरणार नसल्याचे त्याच्याच पक्षातील नेते खासगीत सांगत असताना राज ठाकरे जो निर्णय घेतील तो मनसे कार्यकर्त्यांसाठी अंतिम असल्याचे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगांवकर यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर महायुतीत मनसे सामील होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदार संघातून त्यांच्या पक्षाचा एखादा उमेदवार उभा राहील असेही ठामपणे सांगण्यात येत होते. मात्र गेले अनेक दिवस चर्चा सुरु आहे हे एकसुरी वाक्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, उद्धवसेना यांच्याकडून या मतदारसंघासाठी अरविंद सावंत यांची उमेदवारी घोषित होऊन अनेक दिवस झाले. हा मतदार संघ भाजपला राहुल नार्वेकर यांच्यासाठी हवा आहे. पण कोण उमेदवार लढणार हे स्पष्ट न झाल्याने दक्षिण मुंबईचा तिढा कायम आहे.
९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दक्षिण मुंबई हा राज्यातील काही लोकसभा मतदारसंघापैकी एक आहे की त्या ठिकाणी महायुतीमधून कोणता उमेदवार द्यायचे हे अजून ठरत नाही. त्यामुळे कार्यकर्तेसुद्धा संभ्रमात आहेत. या मतदारसंघावर महायुतीतर्फे भारतीय जनता पार्टी आणि शिंद गट या दोघांनी दावा केला आहे.
मात्र, मनसेप्रमुखांची राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर मनसे उमेदवार या जागेवर लढण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसे कोणता उमेदवार देणार याचे उत्तरही मिळत नाही.
सध्याच्या घडीला या मतदार संघात महाविकास आघाडीकडून या आधी दोन वेळा विजय प्राप्त केलेल्या अरविंद सावंत यांचे उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव सेना आणि त्याच्या सहकारी पक्षांनी निवडणुकीच्या कामास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.
मनसेतील नेते आणि महायुतीमधील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्यानंतर या ठिकणाहून मनसेकडून बाळा नांदगावकर निवडणूक लढवतील असे सांगितले जात होते. त्याचबरोबर कुलाबा येथील भाजप आमदार राहुल नार्वेकरसुद्धा या ठिकाणाहून लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले होते. लोकसभा मतदारसंघात त्यांनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली होती. मात्र असे चित्र असले तरी अद्याप कुणाच्याही नावावर या ठिकणी शिक्कामोर्तब झालेले नाही.
मनसेने उमेदवार दिल्यास त्यांनी कमळ किंवा धनुष्यबाणावर लढावे अशी अट घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यास मनसेने विरोध केला आहे. आता या ठिकाणी शिंदे सेना, भाजप की मनसे कुणाचा उमेदवार निवडणूक लढविणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.