Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : मविआ, महायुतीच्या उमेदवारांनंतर ‘नोटा’लाच सर्वाधिक पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 08:45 AM2024-06-05T08:45:38+5:302024-06-05T08:46:12+5:30
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : काही विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षाही अधिक प्रमाण
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : मुंबई : मुंबईच्या सहाही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वगळता रिंगणात उतरलेल्या अन्य कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला किंवा अपक्षांना ‘नोटा’पेक्षा अधिक मते मिळवता आली नाहीत. मतदारांनी ‘नोटा’लाच पसंती दिली आहे. राज्यात फोडाफोडीचे राजकारण झाल्यानंतर मतदारराजाने मतदानाकडे पाठ फिरवली. राज्यात मतदानाचा टक्का घटला. आधीच कमी मतदान त्यामुळे कोणता उमेदवार किती मते घेतो आणि किती मतांनी आघाडी घेतो, याकडे सर्वांचे लक्ष होते.
सन २०१९ च्या निवडणुकीतील ‘नोटा’ मतांच्या प्रमाणापेक्षा या निवडणुकीत ‘नोटा’ मतांचे प्रमाण घसरले असले तरी काही विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा ‘नोटा’चे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या राजकारणाची दिशा बदलल्यानंतर मतदारांनी उमेदवारांबाबत नाराजी व्यक्त केली होती.
परिणामी, मतदानाचा टक्काही घसरला होता. काहींनी तर मतदान न करण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी आपली नाराजी ‘नोटा’द्वारे व्यक्त केली. प्रमुख पक्षांचे उमेदवार वगळता निवडणुकीच्या आखाड्यात एकही सक्षम उमेदवार नसल्याने मतदारांनी ‘नोटा’लाच पसंती दिली. मुंबईतील एकूण सहा मतदारसंघांत ७५,२६३ मतदारांनी ‘नोटा’चा अधिकार बजावला.
- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ होती. वायकर यांना कीर्तिकर यांच्यापेक्षा अवघ्या ४८ मतांचे मताधिक्य आहे. मात्र, याच मतदारसंघात ‘नोटा’च्या पारड्यात १५,१६१ मते पडली आहेत.
मुंबई उत्तर पश्चिम
एकूण मतदान नोटा मते नोटा टक्केवारी
२०२४ ९,५४,९३९ १५,१६१ १.५९
२०१९ ९,४१,४९७ १८,२२५ १.९४
दक्षिण मुंबई
२०२४ ७,७३,११३ १३,४११ १.७३
२०१९ ८,०१,६११ १५,११५ १.८९
दक्षिण मध्य
२०२४ ७,९४,५२४ १३,४२३ १.६९
२०१९ ७,९७,२५० १३,८३४ १.७३
उत्तर पूर्व
२०२४ ९,२६,४६९ १०,१७३ १.१
२०१९ ९,०८,९९३ १२,४६६ १.३७
उत्तर मुंबई
२०२४ १०,३५४९३ १३,३४६ १.२९
२०२९ ९,८९,७५९ ११,९६६ १.२१
उत्तर मध्य
२०२४ ९,१०,५६२ ९,७४९ १.०७
२०२९ ९,०१,७८४ १०,६६९ १.१८