- अमर शैलामुंबई : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचा पराभव करत उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांनी दणदणीत विजय प्राप्त केला. धारावीचा पुनर्विकासाचा मुद्दा त्यांच्या प्रचारात बराच गाजला. विजयानंतर त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यांच्याशी झालेल्या वार्तालापाचा सारांश.
तुमच्या विजयाकडे तुम्ही कसे पाहता? उद्धव ठाकरे यांची प्रतिमा, त्यांनी मुख्यमंत्रिपदी असताना केलेले काम यांचे प्रतिबिंब या विजयात आहे. मतदारांनी लोकशाही टिकावी, संविधानाचे रक्षण व्हावे, यासाठी मतदान केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारख्या चारित्र्यवान, संस्कारी नेत्याला षडयंत्र करून पाडले हे लोकांना आवडले नाही. कटकारस्थान करून चिन्ह काढून घेतले. मात्र ज्यांनी हे कटकारस्थान रचले आता त्यांचे काहीही शिल्लक राहिले नाही. देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार असल्याचे म्हणत आहेत. त्यांनी केवळ राजीनामा देण्याच्या गोष्टी करू नयेत. त्यांनी राजीनामा देऊन मैदानात उतरावे.
धारावीच्या पुनर्विकासावर काय भूमिका असेल? धारावीकरांना ज्या पद्धतीचा विकास हवा आहे, तशा पद्धतीचा विकास धारावीत साधण्याचा प्रयत्न राहणार आहे. धारावीकरांना ज्या पद्धतीचे घर, दुकान हवे आहे, तसे त्यांना देऊन या भागाचा विकास करणार आहोत. धारावीकरांचे तिथेच पुनर्वसन केले जावे. पुनर्विकास झालेली धारावी ही आदर्श वसाहत उभी राहील, यासाठी कटिबद्ध असू. त्यादृष्टीने पुढील काळात काम करणार आहोत.
तुमच्या विजयाचा पक्षाला मुंबईत कसा फायदा होईल? लोकसभा निवडणुकीत राहिलेले हे चित्र पालिका आणि विधानसभा निवडणुकीतही दिसेल.