Lok Sabha Election Result 2024 : "उ. बा. ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 08:59 AM2024-06-05T08:59:27+5:302024-06-05T10:40:08+5:30
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे.
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील लोकसभेचे मैदान जिंकताना महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत दमदार यश संपादन केले. महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंनी ९ तर शरद पवार यांच्या पक्षाने ८ जागांवर विजय मिळविला. भाजपने ९, शिंदेसेनेने ७ तर अजित पवार गटाने एक जागा जिंकली. याच दरम्यान मनसे नेत्याने खोचक टोला लगावला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उ .बा .ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय आहे" असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.
उ .बा .ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 5, 2024
गेल्यावेळी ४१ जागा जिंकणाऱ्या युतीमध्ये फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी सहभागी झाली पण गेल्यावेळपेक्षा निम्म्याहून चार जागा यावेळी कमीच मिळाल्या. थेटच सांगायचे तर शरद पवार-उद्धव ठाकरे-नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यावर मोठी मात केली. भाजपने २८ जागा लढल्या आणि केवळ ९ जिंकल्या. काँग्रेसने १७ जागा लढल्या आणि १३ जिंकत खणखणीत यशाला गवसणी घातली. देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीची लढत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी प्रचंड बहुमताने जिंकली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा धक्का बसला. प्रमुख पराभूत उमेदवारात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, महादेव जानकर, डॉ. हीना गावित, नवनीत राणा, प्रताप पाटील चिखलीकर, चंद्रकांत खैरे, डॉ. सुजय विखे पाटील यांचा समावेश आहे. प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, पीयूष गोयल, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, सुनील तटकरे यांचा समावेश आहे. सांगलीत भाजप व उद्धव सेना या दोघांनाही धक्का देत अपक्ष विशाल पाटील जिंकले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) बिनशर्त पाठिंबा मिळवूनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईत प्रभाव पाडता आलेला नसल्याचे मंगळवारी जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने काँग्रेसप्रणित आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी मनसे नेते राज ठाकरे हे भाजपविरोधात प्रचारासाठी आक्रमकपणे मैदानात उतरले होते. मात्र ‘लाव रे तो व्हिडीओ’ची जादू भाजपच्या मतदारांवर प्रभाव टाकण्यास अपुरी पडली आणि काँग्रेसप्रणित आघाडीने मुंबईसह राज्यात चांगलीच आपटी खाल्ली. यंदाच्या निवडणुकीत मनसेने गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य सभा घेऊन भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मात्र, भाजपप्रणित महायुतीची मुंबईसोबतच राज्यभर पीछेहाट झाल्याचे दिसून आले.