मुंबई - राज्यात नोटावर (नन अदर दॅन अबाऊ) ४,१५,५८० मते पडली. एकूण मतदानापैकी नोटाचा वाटा ०.७३ टक्के आहे. सर्वाधिक २७,२७० मते ही रायगडमध्ये पडली. तेथे अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले.
विजयी उमेदवारापेक्षा नोटाला कितीतरी अधिक मते मिळाली ती उत्तर-पश्चिम मुंबईत. तिथे शिंदेसेनेचे रवींद्र वायकर केवळ ४८ मतांनी जिंकले आणि नोटावर १५,१६१ मते पडली. धुळ्यामध्येही विजयी मताधिक्यापेक्षा नोटावर अधिक मते पडली. तिथे काँग्रेसच्या शोभा बच्छाव ३,८३१ मतांनी जिंकल्या तर नोटावर ४,६९३ इतकी मते पडली. बीडमध्ये शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा ६,५५३ मतांनी पराभव केला. तेथे नोटाला २,०८७ मते मिळाली. उत्तर-मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपचे ॲड. उज्ज्वल निकम यांना १६,५१४ मतांनी पराभूत केले. तेथे नोटाला ९,७४९ मते मिळाली. नोटाला सर्वांत कमी पसंती देणाऱ्या मतदारसंघांमध्ये बीड (२,०८७), अमरावती (२,५४४), आणि सोलापूरचा (२,७२५) समावेश आहे. कोणताही उमेदवार पसंत नसलेल्या मतदारांसाठी नोटा हा पर्याय दिला जातो.
इथे १० हजारहून अधिक मते नोटावर १० हजारांपेक्षा अधिक मते पडलेल्या अन्य मतदारसंघांमध्ये भंडारा-गोंदिया (१०,२६८), कल्याण (११,६८०), चंद्रपूर (१०,८४३), गडचिरोली (१६,५७७), जळगाव (१३,९१९), नंदुरबार (१४,१२३), उत्तर मुंबई (१३,३४६), उत्तर-पूर्व मुंबई (१०,१७३), दक्षिण मुंबई (१३,४११), दक्षिण-मध्य मुंबई (१३,४२३), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (११,६४३), ठाणे (१७,९०१) यांचा समावेश आहे.
२०१९ च्या तुलनेत कमी झाले नोटावरील मतदान२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नोटाला ४,८६,९०२ इतकी मते मिळाली होती. यावेळी त्यापेक्षा ७१,३२२ मते कमी मिळाली. २०१९ मध्ये पालघर मतदारसंघात नोटाला २९,४७९ मते मिळाली होती. यावेळी ती कमी होऊन २३,३८५ मते नोटाला पडली. गडचिरोलीत गेल्यावेळी नोटाला २४,५९९ मते मिळाली होती. यावेळी ती बरीच कमी होऊन १६,५७७ मते मिळाली.