Join us

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेच्या यशानं उद्धव ठाकरे ठरले राजकारणातील 'चाणक्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 5:32 PM

उद्धव ठाकरेंच्या युतीच्या निर्णयावर शिवसैनिकही नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र आज निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय योग्य होता असं दिसून येतं.  

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यातील विजयी समीकरणाचं गणित मांडायचे ठरले तर सध्याच्या घडीला राजकारणातील चाणक्य म्हणून उद्धव ठाकरे यांना ओळखलं जाऊ शकतं. गेली साडेचार वर्ष भाजपाशी भांडून अखेर निवडणुकीच्या तोंडावर युती केल्याने शिवसेनेवर अनेकांनी टीका केली. युतीमुळे भाजपापेक्षा सर्वात मोठा तोटा शिवसेनेला होईल असं जाणकार सांगत होते.मात्र प्रत्यक्षात निकाल शिवसेनेसाठी न फायदा न तोटा अशा स्वरुपाचा राहिला. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेच्या प्रस्थापितांना जनतेने नाकारलं असलं तरी हातकणंगले, कोल्हापूर उस्मानाबाद, पालघर या जागा जिंकून उद्धव ठाकरेंनी ती तूट भरुन काढली आहे. शिरुर, अमरावती, रायगड हे मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निघून गेले मात्र इतर जागा जिंकल्याने शिवसेनेशी सरशी झाली आहे. मावळमध्ये शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना हरवून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी गड शाबूत ठेवला. मात्र शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभूत केला. अमरावती मतदारसंघात आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात नवनीत राणा यांनी कडवी झुंज देत शिवसेनेकडून हा मतदारसंघ खेचून घेतला. रायगडमध्ये अनंत गीते यांच्याविरोधातील नाराजी शिवसेनेला दूर करता आली नाही त्यामुळे तिथेही राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी बाजी मारली. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांना पक्षातंर्गत होत असलेला विरोध डावलून पुन्हा खैरेंना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्याठिकाणी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मतांचे विभाजन झालं त्याचा फटका चंद्रकांत खैरेंना बसला. 

लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती केल्याने शिवसेनेवर विरोधकांना तोफ डागली. शिवसेनेबाबत अनेक विनोद सोशल मिडीयात व्हायरल झाले. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावर शिवसैनिकही नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र आज निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय योग्य होता असं दिसून येतं.  

लोकसभा निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट होत आलेलं आहे. भाजपाप्रणित एनडीएला केंद्रात सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळताना दिसत आहे. शिवसेना हा भाजपाचा जुना मित्रपक्ष आहे. गेली अनेक वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. यंदाच्या निवडणुकीतलं हे यश शिवसेनेसाठी आगामी काळात निश्चित लाभदायक ठरणार आहे. केंद्रातील सत्तेत शिवसेनेला महत्त्वाचा वाटा मिळू शकतो. त्यामुळे राजकारणात टायमिंग साधण्याला महत्त्व असतं. ते टायमिंग तुम्ही साध्य केलं तर यश नक्की मिळतं हे उद्धव ठाकरेंच्या चाणक्यनितीने पटवून दिलं आहे. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक निकालशिवसेनाउद्धव ठाकरेनिवडणूकभाजपा