मुंबई : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी दणदणीत विजय प्राप्त केला. विजयानंतर त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. नवे राजकीय समीकरण असले तरी आमच्या आणि सर्व सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
राजकीय समीकरणे नवी होती, चिन्हही नवे होते, तरीही विजयाची खात्री होती? विजयाची खात्री पहिल्या दिवसापासूनच होती. खासदारकीची हॅट्ट्रीक करणार हा आत्मविश्वास होता. नवे राजकीय समीकरण असले तरी आमच्या आणि सर्व सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. विरोधक आम्हाला मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक जिंकले असे म्हणायचे. मात्र या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक जिंकल्याचा आनंद आहे.
असली आणि नकली शिवसेना असा प्रचार करण्यात आला होता... विरोधकांनी मोठ्या प्रमाणात पाण्यासारखा पैसा निवडणूक जिंकण्यासाठी ओतला. मात्र नागरिकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विरोधकांना आता उत्तर मिळाले असेल. नकली शिवसेना कुणाची आणि असली शिवसेना कुणाची हे मतदारांनीच त्यांना दाखवून दिले आहे.
विजयाचे श्रेय कुणाला? आमच्या विजयाचे ‘मॅन ऑफ द सिरीज’ हे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी निवडणुकीच्या काळात संपूर्ण राज्यात आक्रमकपणे प्रचार केला. पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचविली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे हा आजचा विजय आहे.
निवडणुकीत कोणती आव्हाने होती? निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांनी गैरमार्गांचा, धनशक्तीचा, वापर केला होता. त्यांच्याविरोधात आम्ही सर्व एकत्र लढलो. मतदार त्यांच्या भूलथापांना बळी पडला नाही.
भविष्यातील राजकारणावर याचा काय परिणाम होईल? लोकसभेच्या या निकालाचा परिणाम निश्चितच विधानसभा निवडणुकीवर होणार आहे. येत्या काळात विरोधकांना ते कळेलच.