Maharashtra Lok Sabha election results 2024: ...म्हणून वर्षा गायकवाड, अनिल देसाई जिंकले!
By अतुल कुलकर्णी | Published: June 6, 2024 06:37 AM2024-06-06T06:37:23+5:302024-06-06T06:38:41+5:30
शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांत वर्षा गायकवाडांना लीड, उज्ज्वल निकम यांची संधी हुकली
मुंबई : अटीतटीच्या मतमोजणीत मुंबई उत्तर मध्यमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी ५० हजारांचे मताधिक्य मोडून काढत १६ हजारांची लीड मिळवली. हे झाले कसे? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ५ मे रोजीचा लोकमत वाचला असेल तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळेल. काँग्रेसमधून किती साथ मिळेल याविषयी गायकवाड साशंक होत्या. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील दोन्ही आमदारांच्या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे भाजपच्या गोटात तीव्र नाराजी आहे.
आपण काँग्रेसच्या नेत्यांना फोन केले, पण ते आपले फोनही घेत नव्हते, अशी तक्रार वर्षा गायकवाड यांची होती. तर गायकवाड यांनी आपल्याला उमेदवारी अर्ज भरताना बोलावले देखील नाही अशी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची तक्रार होती. या सगळ्यांना एकत्र बसवून त्यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केले पण त्यात यश आले नाही. दुसरीकडे काँग्रेसचे अमिन पटेल, नसीम खान यांनी सोबत राहत तर नवाब मलिक यांनी पडद्याआडून वर्षा गायकवाड यांना मदत केली.
चांदीवली (२,१०,५२८), कुर्ला (१,४६,७६९) कलिना (१,२३,९६८) या तीन विधानसभा मतदारसंघातून एवढे मतदान झाले. त्यात चांदीवलीमधून १,०२,९८५, कुर्लामधून ८२,११७, आणि कलिनामधून ६७,६२० एवढे प्रचंड मतदान वर्षा गायकवाड यांना मिळाले. या तिन्ही मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना २,०८,५४२ एवढी मते मिळाली. या तीन मतदारसंघाने वर्षा गायकवाड यांना ४४,१८० मतांची लीड दिली. काँग्रेसचे बाबा सिद्दिकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले. यांचे चिरंजीव आ. झिशान सिद्दिकी काँग्रेसमधून आमदार झालेले आहेत मात्र त्यांच्या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना तब्बल २७,४६२ एवढा लीड मिळाला.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा मतदारसंघ उज्ज्वल निकम यांच्या मदतीला धावून येईल असे बोलले जात असताना प्रत्यक्षात शेलार यांच्या मतदारसंघातून निकम यांना फक्त ३,६०६ एवढाच लीड मिळाला. निकम यांच्या मदतीला पराग अळवणी यांचा विलेपार्ले मतदारसंघ धावून आला. अळवणी यांनी निकम यांना ५१,३२५ एवढ्या मतांची आघाडी दिली. पण बाकी मतदारसंघाने ती आघाडी संपवून टाकली. चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे आणि कुर्लाचे आमदार मंगेश कुडाळकर हे दोघेही शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. मात्र या दोन्ही ठिकाणी वर्षा गायकवाड यांना लीड मिळाली आहे. कलिनामधून उद्धव ठाकरे गटाचे संजय पोतनीस आमदार आहेत. त्यांनीदेखील वर्षा गायकवाड यांना लीड दिली.
‘इस हात लो, उस हात दो’
अनिल देसाई यांनादेखील अशाच पद्धतीने मदत झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनिल परब, संजय पोतनीस यांनी बाजू सांभाळली. हे करत असताना मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर मध्य या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे सेनेचे अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड या दोघांमध्ये ‘इस हात लो, उस हात दो’, असे नियोजन केले गेले. ही देवाणघेवाण यशस्वी ठरली. अनिल देसाई निवडून येऊ शकत नाहीत, असे वाटत होते त्यांना देसाईंच्या विजयाने आश्चर्याचा धक्का बसला आणि अटीतटीच्या लढाईत वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली.