"मला सरकारमधून मोकळं करा"; फडणवीसांच्या घोषणेनंतर ठाकरे गट म्हणतो, "आता विनोद तावडे मुख्यमंत्री..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 03:47 PM2024-06-05T15:47:09+5:302024-06-05T16:08:13+5:30
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी काढून घेण्याची मागणी केलेली असताना ठाकरे गटाने मोठं विधान केलं आहे.
Maharashtra Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ अपयश आलं आहे. राज्यात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. तर भाजप २३ जागांवरुन थेट नऊ जागांवर आला आहे. भाजपच्या या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. पत्रकार परिषद घेत आम्ही कमी पडलो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीसांच्या या मागणीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे शिवसेनेने देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत असं म्हटलं आहे.
भाजपच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याचं मान्य केलं. कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यासोबत मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकीकडे फडणवीसांनी जबाबदारी काढून घेण्याची मागणी केलेली असताना दुसरीकडे ठाकरे गटाने महत्त्वाचे विधान केलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पराभव झाल्याचे म्हटलं आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची विनंती करणे, म्हणजे त्यांनी सन्मानपूर्वक निरोप मागणे आहे. कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनाही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशीही चर्चा होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रात नकारात्मकता असून त्याचा फटका भाजपाला बसलेला आहे. भाजपाकडून कदाचित देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्याच्याआधी आपण स्वतःहूनच बाहेर पडावे, असा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून होत आहे. मला वाटते की भाजपने विनोद तावडे यांचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विचार केला पाहिजे. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पराभव झाला आहे," असे सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.
Mumbai: Shiv Sena (UBT) leader Sushma Andhare says, "Devendra Fadnavis will not become CM of Maharashtra again. Chandrashekhar Bawankule also accepted the loss, I think BJP must think about Vinod Tawde as CM of Maharashtra. Under Fadnavis' leadership, they lost seats in… pic.twitter.com/DtFX9tb1V0
— ANI (@ANI) June 5, 2024
वरिष्ठांच्या सल्ल्याने पुढची कारवाई - देवेंद्र फडणवीस
"अर्थात मी सरकारच्या बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही करणार आहोतच. त्या टीमसोबत मी असेन. यासंदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे. त्यानंतर त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगितील त्यानुसार मी पुढची कारवाई करेन," असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.