Maharashtra CM Swearing-in Ceremony: मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भव्य-दिव्य शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय गाठले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रश्नांना अगदी शांतपणे, संयमित आणि स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली. तसेच आता महायुती सरकारची पुढील भूमिका काय आणि कशी असणार आहे, याबाबतचे सूतोवाचही केले. शक्तिपीठ महामार्गाला अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना या शक्तिपीठ महामार्गाची सद्य परिस्थिती काय आहे? कुठपर्यंत काम झाले आहे? याची माहिती देताना शक्तिपीठ महामार्ग पूर्ण होण्यासाठी आग्रही असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्ग होणारच!
शक्तिपीठ महामार्गावरील प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे. सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगत आहेत की, तुम्ही भूसंपादन करा. पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो, तिथे खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आम्ही ज्यावेळेस समृद्धी महामार्ग केला, त्यावेळी आम्ही विरोध पत्करून केला नाही. लोकांना समजवले. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गासंदर्भात आमचा असा प्रयत्न असेल की, ज्या भागापर्यंत विरोध नाही. तिथपर्यंतची अलाइनमेंट पूर्ण करायची आणि पुढचे काम जे आहे, ते सगळ्यांची चर्चा करून पुढे न्यायचे आहे. त्यासाठी काही पर्याय शोधता येऊ शकतात का, याचा विचार करता येऊ शकेल. शेतकऱ्यांना नाराज करून, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची आमची मानसिकता नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शक्तिपीठ महामार्गासाठी माझा एकाच कारणासाठी आग्रह आहे
काही पर्यायी रस्ते तयार करता येतील का किंवा आता जो महामार्ग आहे, त्याला शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा एखादा उन्नत मार्ग बांधून त्यातून पर्याय काढता येईल का, असा चर्चेतून मार्ग काढू. सांगली जिल्ह्यापर्यंत शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी माझा एकाच कारणासाठी आग्रह आहे. ते म्हणजे समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचे चित्र बदलले. आता महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक मॅग्नेटचा विस्तार पुण्याहून छत्रपती संभाजीनगर आणि जालनापर्यंत होताना दिसत आहे. पुण्यातून ते शिफ्ट होणारच नाही. अशाच प्रकारे शक्तिपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलणार आहे. म्हणूनच शक्तिपीठ महामार्गासाठी माझा आग्रह आहे. परंतु, सगळ्यांशी चर्चा करूनच त्यातील पुढील निर्णय होईल. तोपर्यंत होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाबाबतही देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, मुंबई-गोवा महामार्गाचा विषय काढला की, आम्हाला जरा अडचण होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या संसदेत सांगितले की, देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे होऊ शकत नाही, तिथे महामार्ग केले. पण या एका महामार्गाने मला फार त्रास दिला. पण मला असे वाटते की, आता ते अंतिम टप्प्यात आहे.