Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू असून, याबाबत राज्यभरात मोठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचे नेते या योजनेवरून महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. असे असले तरी महायुती सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेचे विविध कार्यक्रम राज्यभरात घेताना पाहायला मिळत आहेत. यातच आता शासनाने याबाबत मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत २१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली होती. त्यानंतर ज्या महिलांनी अद्यापही या योजनेत अर्ज केले नाहीत. त्यांना या योजनेला आणि निधीला मुकावे लागणार का, असा प्रश्न महिलांना पडला होता. मात्र, या महिलांना आता सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेची मुदत ही महिन्याभरासाठी वाढवली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कधीपर्यंत दिली मुदतवाढ? योजनेत अर्ज करण्यासाठी किती दिवस वाढवले?
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत असून गावखेड्यात कोट्यवधी महिलांना या योजनेसाठी आपले अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासही सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही मिळून महिलांना ३ हजार रुपये मिळाले आहेत. रक्षाबंधन सणापूर्वीच सरकारने महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये वर्ग केल्यामुळे इतर महिलांचाही मोठा प्रतिसाद योजनेला दिसून येत आहे.
महिलांना आता एकूण ४ हजार ५०० रुपये मिळणार
३१ ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होता, आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून, आता ३० सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण ४ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेंतर्गत नोंदणीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. योजनेतील लाभार्थी महिलांना जुलैपासून दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. त्यानुसार, दीड कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पहिल्या दोन महिन्यांचा हफ्ता म्हणून ३ हजार रुपये जमा झाले आहेत.
अनेक महिलांना अद्याप या योजनेत अर्जच करता आला नव्हता
जवळपास ४० ते ४२ लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार नंबर लिंक नाही. त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर होऊनही त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. एकदा आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक झाले की, या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच अनेक महिलांना अद्याप या योजनेत अर्जच करता आला नव्हता. अनेकांचे अर्ज देखील रद्द करण्यात आले होते. त्यामुळे या महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने आला लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.