लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित महामुलाखत पहिल्यांदा होत असून, ती घेणार आहेत प्रख्यात अभिनेते, नटसम्राट नाना पाटेकर. अत्यंत सन्मानाचा असा ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळा येत्या मंगळवारी (११ ऑक्टोबर) मुंबईच्या एनएससीआयच्या डोम थिएटरमध्ये होणार असून, या मुलाखतीविषयी राज्यभर कमालीची उत्सुकता आहे.
अनेक वर्षे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्याची अनेक क्षेत्रांतील मान्यवर कायम वाट पाहत असतात. लोकसेवा - समाजसेवा, शिक्षक, क्रीडा, उद्योग, वैद्यकीय, प्रशासन - आयएएस प्रॉमिसिंग, आयपीएस प्रॉमिसिंग, सीएसआर, कृषी आणि राजकारण या क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्यांचे नॉमिनेशन केले जाते. त्यासाठी मान्यवर ज्युरी आणि जगभरातील ‘लोकमत’चे वाचक ऑनलाइन पद्धतीने मतदान करतात. त्यातून विजेत्यांची निवड केली जाते.
यावर्षी देखील मान्यवरांचा सत्कार होणार असून, या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यंमत्री फडणवीस यांची नाना पाटेकर हे महामुलाखत घेतील. नाना पाटेकर कोणती गुगली टाकणार आणि हे दोन्ही कसलेले नेते त्याचा कसा मुकाबला करणार? याकडे राज्याचे लक्ष लागले नसेल तरच नवल. समारंभाच्या मोफत प्रवेशिका ‘बुक माय शो’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राची कला आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देणारा ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा कार्यक्रम खरोखरच युवा पिढीसाठी एक आदर्श आहे आणि अशा पुरस्कार सोहळ्यात सारस्वत बँक सहभागी आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे! - गौतम ठाकूर, अध्यक्ष, सारस्वत बँक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"