गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रालाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. दरम्यान, कोरोनाला नियंत्रणात आणायचं असेल तर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली गेली पाहिजे असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. १ मे पासून देशातही १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकार कोरोना लसीच्या थेट आयातीच्या शक्यतेवर विचार करत आहे, जेणेकरून जास्तीतजास्त लोकांना लसीकरण केलं जावं. ही माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. जर असं झालं तर तीन आठवड्यांत मुंबईत सर्वांचं लसीकरण करण्याचा रोडमॅप आहे. लसीची किंमत हे एक कारण नाही आणि राज्य सरकार लवकरात लवकार लस खरेदी करण्याचाही विचार करत असल्याचं ते म्हणाले. "अन्य राज्यांप्रमाणे आम्हीदेखील लसीसाठी संघर्ष करत आहोत. आम्ही मुंबईसाठी जागतिक स्तरावर लसीची खरेदी करण्याची शक्यता पडताळून पाहत आहोत. जर आम्ही असं केलं, तर मुंबईच्या नागरिकांचं तीन आठवड्यांच्या आत लसीकरण करण्याचा रोडमॅप आमच्याकडे आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.
लसीकरणाबाबत सकारात्मक"याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. कारण लस आल्यानंतर ज्या चिंता होत्या त्या आता पहिल्यापेक्षा कमी झाल्या आहेत. आता लोकांना लसीचे दोन्ही डोस हवे आहेत आणि मला वाटतं हे महत्त्वाचं आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. जोपर्यंत सर्व भारतीयांचं लसीकरण होत नाही तोवर सर्व भारतीय सुरक्षित नसल्याचंही ते म्हणाले. राज्याच्या वेगळ्या अॅपसाठी विनंतीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पत्र लिहिलं आहे. कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccination) राज्यासाठी वेगळे अॅप तयार करण्याची परवानगी द्या. कोविन अॅपवर सातत्याने समस्या येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अॅप्लिकेशन तयार करणाची परवानगी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.