मुंबई - विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांचे नाव देण्याचा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अजब सल्ल्यावरून वाद निर्माण झाला आहे. गिरीश महाजन यांच्या विधानाचा सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही समाचार घेतला आहे. ''महिलांची नावे दिल्याने दारूविक्रीचा धंदा वाढतो असे व्यापारी मार्गदर्शन गिरीश महाजन यांनी केले आहे व ते मोलाचे आहे. नशीब मंत्रिमंडळात स्मशान खाते नाही आणि महाजन हे त्या खात्याचे मंत्री नाहीत. नाहीतर तिरड्या, लाकडे व मडकी विकली जावीत यासाठी जास्तीत जास्त मृत्यू कसे होतील यावर त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागले असते. महिलांनी बाटली आडवी केली, मंत्र्यांनी बायकांची नावे देऊन बाटली उभी केली. अरे, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आपला?'', अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय ?महाराष्ट्र सरकारचे एक मंत्री गिरीश महाजन यांनी दारूविक्री वाढावी यासाठी कंबर कसली आहे. दारूविक्री कमी झाल्यामुळे राज्याचे उत्पन्न कमी झाले ही चिंता सरकारला सतावीत आहे. त्यामुळे दारूविक्रीत वाढ व्हावी यासाठी दारूला महिलांची नावे द्यावीत असे बेधुंद विधान महाजन यांनी केले आहे. महाजन हे साधनशूचिता वगैरे मानणारे असे ‘दक्ष’ संघ स्वयंसेवक आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांची दारूविक्रीविरोधात आंदोलने सुरूच आहेत. बाटली आडवी करण्याच्या या आंदोलनात हजारो महिला सामील झाल्या आहेत. अशावेळी महिलांनाच दारूविक्रीचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ करावे अशी सूचना महाराष्ट्राच्या एका मंत्र्याने करावी हे धक्कादायक आहे. अनेक गावांतून महिलांनी दारू तडीपार केली आहे हे बहुधा सन्माननीय मंत्र्यांना माहीत नसावे. नंदुरबार जिह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास श्री. महाजन पोहोचले. कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी मंत्र्यांसमोर एक खंत व्यक्त केली ती म्हणजे आमच्याकडे डिस्टिलरी प्रकल्प असून दारूची विक्री घटली आहे. यावर मंत्र्यांनी जणू वडीलकीच्या नात्याने अनुभवी सल्ला दिला व दारूविक्री वाढविण्याचा रामबाण उपाय सांगितला. ‘‘चेअरमनसाहेब रडू नका, दारू उत्पादनांना महिलांची नावे दिल्यावर त्यांची बाजारात विक्री वाढते. सध्या सातपुडा साखर कारखाना बनवीत असलेल्या दारूचे नाव ‘महाराजा’ असे आहे. त्याचे नाव ‘महाराणी’ करावे’’ असे श्री. महाजन यांनी सांगितले.
महाजन यांनी आणखी पुरवणी माहिती देऊन या क्षेत्रातील आपण ‘डॉक्टरेट’ मिळविल्याचे दाखवून दिले. ते म्हणाले, ‘‘राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावचे शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होते. त्यांच्या कारखान्यातील दारूचे नाव ‘भिंगरी’ आहे, तर शंकरराव कोल्हे यांच्या कारखान्यात निर्माण होणाऱया दारूचे नाव ‘ज्युली’ असे आहे.’’ भिंगरी व ज्युलीचे मार्केट बाजारात जास्त आहे. त्यामुळे महिलांची नावे दिल्याने दारूविक्रीचा धंदा वाढतो असे व्यापारी मार्गदर्शन गिरीश महाजन यांनी केले आहे व ते मोलाचे आहे. महाजन यांनी भिंगरी, ज्युली, महाराणी अशा ‘ब्रॅण्ड’ची जाहिरातबाजी केली, पण दारूच्या बाटल्यांना महिलांची नावे दिल्याशिवाय पर्याय नाही असेही एक प्रकारे सुचविले. एवढेच नव्हे तर आपल्या या तर्कटासाठी त्यांनी गुटख्याचीही साक्ष काढली. गुटख्याला विमल, केसर अशी नावे आहेत आणि गुटख्यावर बंदी असूनही हे ‘ब्रॅण्ड’ विकले जातात असे ते म्हणाले. थोडक्यात गुटख्याला महिलांची नावे असल्याने बंदी झुगारून लोक हा गुटखा विकत घेतात असेच तारे मंत्रीमहोदयांनी तोडले. दारूची विक्री वाढावी, दारूची दुकाने वाढावीत आणि त्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त ‘बेवडे’ व्हावे.
बेवडे व्हा, गटारात पडा आणि स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून घ्या, असाच हा कारभार दिसतोय. एकीकडे दारूबंदी अभियान, सप्ताह, पंधरवडे साजरे करायचे, अवैध दारू उत्पादन आणि विक्रीला आळा बसावा यासाठी ‘ग्रामरक्षक दले’ स्थापन करायची, त्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमात दुरुस्ती करायची आणि दुसरीकडे दारूविक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांची नावे द्या असे दारू उत्पादकांना सांगायचे. बिहारसारख्या राज्याने गेल्या वर्षी राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू केली. तेथील मुख्यमंत्री नितीशकुमार त्यावेळी पंतप्रधान मोदींचे कट्टर विरोधक होते. मात्र त्यांच्या या निर्णयाला मोदींनी जाहीर पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रात मात्र भाजपचेच एक मंत्री दारूविक्री कशी वाढवावी याचे मार्केटिंग फंडे जाहीरपणे सांगत आहेत. हजारो कोटींचा वार्षिक महसूल बुडण्याच्या भीतीमुळे तुम्हाला दारूबंदीबाबत ‘ब्र’ काढता येत नसेलही, पण निदान दारूविक्री वाढविण्याबाबत बदसल्ले देऊन लोकांना मृत्यूच्या दारात ढकलू नका. नशीब मंत्रिमंडळात स्मशान खाते नाही आणि गिरीश महाजन हे त्या खात्याचे मंत्री नाहीत. नाहीतर तिरड्या, लाकडे व मडकी विकली जावीत यासाठी जास्तीत जास्त मृत्यू कसे होतील यावर त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागले असते. महिलांनी बाटली आडवी केली, मंत्र्यांनी बायकांची नावे देऊन बाटली उभी केली. अरे, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आपला?