Nawab Malik : नवाब मलिक यांना अटक; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 'ईडी'ची कारवाई, ३ मार्चपर्यंत कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 05:29 AM2022-02-24T05:29:42+5:302022-02-24T05:30:19+5:30

राजीनामा न घेण्याचा सरकारचा निर्णय; साडेसात तासांच्या चौकशीनंतर कारवाई

maharashtra minister Nawab Malik arrested EDs action in financial malpractice case don dawood ibrahim remand till March 3 | Nawab Malik : नवाब मलिक यांना अटक; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 'ईडी'ची कारवाई, ३ मार्चपर्यंत कोठडी 

Nawab Malik : नवाब मलिक यांना अटक; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 'ईडी'ची कारवाई, ३ मार्चपर्यंत कोठडी 

Next

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती अटक केली. विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे. या कारवाईने पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.   

ईडीचे पथक पहाटे साडेचारच्या सुमारास मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी दाखल झाले. काही महत्त्वपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेतल्यानंतर ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांना घेऊन सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात पोहोचले. यावेळी मलिक यांचा मुलगा अमिरदेखील त्यांच्यासोबत होता. मलिक यांना ताब्यात घेतल्याची माहिती समजताच दुपारी १२ वाजल्यापासून मलिक यांच्या घरासह ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. भाजपविरोधात घोषणाबाजी सुरू झाल्या. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ईडीने साडेसात तासांहून अधिक वेळ केलेल्या चौकशीनंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास मलिक यांना अटक करण्यात आली. 
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील सरदार शाहवली खान आणि सलीम पटेलकडून स्वस्तात जमीन खरेदी केल्याच्या प्रकरणात मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

मंत्रिपदाचा राजीनामा नाही
अटक केलेले मंत्री नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे. मलिक  यांचा मंत्रिपदाचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही, असे महाविकास आघाडीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीचे मंत्री, नेते यांची बैठक झाली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हेही तेथे पोहोचले व बैठकीत सहभागी झाले. त्यानंतर सायंकाळी उशिरा ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. ममता बॅनर्जी यांनीही शरद पवार यांना दूरध्वनी करून मलिक यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली. 

नवाब मलिक यांच्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांचा नंबर असेल असे ट्विट भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी बुधवारी केले.

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करणार
ईडी, सीबीआय आदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि भाजपचे षडयंत्र याविरुद्ध महाविकास आघाडीचे सर्व नेते, मंत्री, आमदार, खासदार गुरुवारी सकाळी १० वाजता मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे देतील. शुक्रवारपासून राज्यभर धरणे, मोर्चे असे आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीच्या अन्य ज्येष्ठ नेते, मंत्र्यांच्या उपस्थितीत सायंकाळी दीड तास बैठक झाली. या अटकेनंतर महाविकास आघाडीने कोणता पवित्रा घ्यावा यावर विचार झाला. कोणत्याही परिस्थितीत केंद्रीय तपास यंत्रणांसमोर झुकायचे नाही आणि या कारवायांच्या मागे भाजप व केंद्र सरकार असल्याचे जनतेत जाऊन सांगायचे, असा निर्णय बैठकीत झाला. 

काय घडले दिवसभरात?
पहाटे ४.३० : ईडीचे पथक सीआरपीएफच्या जवानांसह नवाब मलिक  यांच्या घरी पोहोचले.
सकाळी ७.३० : घरात तासभर केलेल्या चौकशीनंतर ईडीचे पथक नवाब मलिक यांना घेऊन ईडी कार्यालयात पोहोचले. 
दुपारी १२ : नवाब मलिक यांना ताब्यात घेतल्याचे समजताच त्यांच्या घरासह ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची  गर्दी होण्यास सुरुवात. 
दुपारी २.४५ : साडेसात तासांच्या चौकशीअंती नवाब मलिक यांना अटक झाली.
दुपारी ३.३० : वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. 
सायंकाळी 
५ वाजता :  विशेष पीएमएलए कोर्टात वाढीव कोठडीसाठी हजर करण्यात आले.
सुनावणीला सुरुवात
रात्री ८.४० : ईडी कोठडी सुनावताच, कोर्टातून बाहेर पडले

न्यायालयात सुरू हाेता सव्वादाेन तास युक्तिवाद
 

  • विशेष पीएमएलए न्यायालयात ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला, तर नवाब मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी विशेष युक्तिवाद केला.
  • मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम कासकर याच्याविरोधात दहशतवादी कारवाया आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले. त्याच पैशाद्वारे अनधिकृतपणे मालमत्तेचे संपादन करण्यात आले आहे.
  • एका पीडितेकडून हडप करण्यात आलेली संपत्ती दाऊदच्या नातेवाइकांनी व टोळीने मलिक यांच्या कंपनीला हस्तांतरित केली.
  • ईडीने दावा केला की, ३०० कोटी रुपयांची मालमत्ता मलिक यांना अवघ्या ५५ लाख रुपयांत हस्तांतरित करण्यात आली. एवढ्या कमी किमतीला मलिक यांना वादग्रस्त संपत्ती कशी हस्तांतरित करण्यात आली, याची चौकशी करायची आहे.
  • दाऊद व त्याच्या टोळीने केलेल्या कृत्यावर पडदा टाकण्यासाठी व मालमत्ता कायदेशीर असल्याचे दाखविण्यासाठी मलिक यांनी अप्रामाणिकपणे कागदपत्रे केली.
  • मलिक यांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती हाती आली आहे. ती केवळ त्यांच्याकडेच आहे. या सर्व घटनेमागचा मुख्य सूत्रधार आणि लाभार्थी, त्याच्या सहकाऱ्यांबद्दल माहिती मिळू शकते. मिळालेल्या निधीची चौकशी आवश्यक आहे.
  • डी-गँग आणि मलिक यांनी आणखी किती मालमत्ता हडपल्या, दहशतवादी कारवायांसाठीच्या निधीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते तपासाला सहकार्य करीत नसल्याने ईडी कोठडी आवश्यक.  
     

मलिकांचा युक्तिवाद

  • मलिक आणि दाऊद गँगमधील संबंध स्थापित करण्यात आला नाही
  • हा व्यवहार १९९९ मध्ये झाला. तेव्हा पीएमएलए कायदा अस्तित्वात नव्हता. राज्याचे विद्यमान मंत्री देशद्रोही कृत्यांमध्ये सहभागी आहेत, हे दाखविण्यासाठी ईडीने हा खटाटोप केला आहे.
  • ईडीने केलेले आरोप खोडताना देसाई यांनी म्हटले की, आपण थोडा संयम दाखवला पाहिजे. हा हिंदी चित्रपट आहे का, आपले राजकारण कुठे चालले आहे? एका दहशतवाद्याला मते देणारे त्यांचे मतदार नाहीत. ते दीर्घकाळ राजकारणात आहेत. ईडीचा युक्तिवाद असंवैधानिक आहे. 
  • अटक वॉरंटमध्ये ईडीच्या अधिकाऱ्याने मलिक यांना आधीच ‘दोषी’ जाहीर केले आहे. आता न्यायालयाची गरज नाही.
  • मलिक यांच्या मुखत्यारपत्राचा कोणीतरी गैरवापर केला, यासाठी मलिक यांना अटक होऊ शकत नाही. उलट तेच सदरप्रकरणी पीडित आहेत.
     

घरचे अन्न आणि औषधी देण्यास परवानगी
मलिक यांच्या वतीने घरचे अन्न आणि औषधी देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. यावर न्यायालयाने त्यांना औषधी देण्यास परवानगी दिली. ईडी कोठडीत असेपर्यंत त्यांना घरचे अन्न देण्याची परवानगी दिली.

 

यंत्रणांचा गैरवापर 
केंद्र सरकार तसेच तपास यंत्रणांच्या विरोधात नवाब मलिक ज्या पद्धतीने भूमिका मांडत होते, तेव्हाच काहीतरी प्रकरण काढून आज ना उद्या त्यांना त्रास दिला जाईल, याची आम्हाला खात्री होतीच आणि तसेच घडले.  मुस्लिम कार्यकर्ता, नेता असला की दाऊदचे नाव घेऊन प्रकरण उभे कले जाते. मी मुख्यमंत्री असताना दाऊदशी माझा संबंध जोडला होता.  
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस

आम्ही लढत राहू आणि जिंकू
महाविकास आघाडी सरकारशी आमने-सामने मुकाबला करता येत नसल्याने अफझलखानी वार सुरु आहेत. चालू द्या. एक मंत्री कपट करून आत टाकला, असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊ द्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नका. आम्ही लढत राहू आणि जिंकू. 
खा. संजय राऊत, शिवसेना नेते. 


सूडबुद्धीने कारवाई
ईडीने मलिक यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई केली आहे. केंद्र सरकार तसेच केंद्रीय तपास यंत्रणांविरुद्ध ते आवाज उठवत असल्याने ही कारवाई केली गेली. आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत.  त्याचा महाविकास आघाडी भक्कमपणे मुकाबला करेल. 
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

देशाच्या शत्रूशी केले व्यवहार 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर व तिच्या निकटवर्तीयांशी मलिक यांनी जमिनीचे व्यवहार केले. देशाच्या शत्रूंशी असे व्यवहार करणाऱ्या मलिक यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. एनआयएच्या ऑपरेशन्समधून रियल इस्टेटचे व्यवहार हे मनीलॉड्रींगच्या माध्यमातून होत आहेत, हे लक्षात आले.  
देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते

Web Title: maharashtra minister Nawab Malik arrested EDs action in financial malpractice case don dawood ibrahim remand till March 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.