Join us  

मराठा-ओबीसी आरक्षणावरुन विधिमंडळात खडाजंगी; सत्ताधारी विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 1:02 PM

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली.

Maharashtra Monsoon Session ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १३ जुलैपर्यंतची राज्य सरकारला मुदत दिली आहे, यानंतर पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही सुरू आहे. आज विधिमंडळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन चर्चा झाली. सत्ताधारी गटातील आमदारांनी विरोधी पक्षातील आमदारांवर आरोप केले.

आज विधिमंडळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपा आमदार अमित साटम यांनी विरोधी पक्षातील आमदारांवर टीका केली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत महायुतीवर गंभीर आरोपही केले.

Satara: माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी

"काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्रात जातीच्या नावावर तेढ निर्माण होत आहेत, काही गावात मराठ्यांच्या लग्नाला ओबीसी जात नाहीत, ओबीसींच्या लग्नाला मराठे जात नसल्याचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं होतं. पण विरोधी पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार घातला. विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचं आहे, असा आरोपही आमदार अमित साटम यांनी केली. 

"मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे की नाही हे जाहीर करावं, अशी मागणीही भाजपा आमदार अमित साटम यांनी केली. यावेळी सभागृहात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आरक्षणाबाबत साटम यांनी विरोधी पक्षांना आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. 

मनोज जरांगेंना केली विनंती

यावेळी सभागृहात भाजपा आमदार अमित साटम यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली." विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचं आहे, जरांगे यांनी विरोधी पक्षाची काय भूमिका आहे हे पाहावं, असंही आमदार अमित साटम म्हणाले. 

विरोधी पक्षनेत्यांनी दिले प्रत्युत्तर

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. वडेट्टीवार म्हणाले, राजकारण कोण करत आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. महायुतीनेच मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.    

टॅग्स :विधानसभाभाजपाशिवसेनाकाँग्रेसमराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटील