Join us

'पाच हजार महिला झाल्या बेपत्ता,सरकारला नाही पत्ता'; विरोधकांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 1:17 PM

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळात आज विरोधी पक्षांनी महिला बेपत्ता प्रकरणावर सरकारला घेरले.

मुंबई- राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून आजही विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकार विरोधात घोषणा दिल्या. 'गेल्या काही दिवसापूर्वी राज्यातून पाच हजार महिला बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती, यावरुन आता अधिवेशनाच्या पायऱ्यांवर सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. 

Maharashtra Monsoon Session LIVE: विरोधकांना निधी का मिळत नाही?, यशोमती ठाकूर यांचा सवाल

आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, आमदार सतेज पाटील, आमदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधी पक्षांतील आमदार उपस्थित होते. 'राज्यातील महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता',अशा घोषणा देण्यात आल्या. 

दरम्यान, आझ विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील महिला बेपत्ता हे प्रकरण जोरदार गाजले. राष्ट्रवादीचे आमदार अलिन देशमुख यांनी ही या प्रकरणावर आवाज उठविला.  

राज्यात जानेवारी २०२३ ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५ हजार ६१० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज सरासरी ७० महिला बेपत्ता होत आहेत, अशी धक्कादायक आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत सादर केली. 

देशमुख म्हणाले की, राज्यातील बेपत्ता होणाऱ्या महिला व मुलींची संख्या अत्यंत धक्कादायक आहे. जानेवारी २०२३ ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५ हजार ६१० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी मार्च महिन्यात जवळपास २२०० जणी बेपत्ता झाल्या आहेत. पुणे शहरात बेपत्ता होणाऱ्या मुली व महिलांची संख्या सर्वाधिक आहे. बेपत्ता महिलांची ही आकडेवारी  लक्षात घेऊन स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या विषयावर सभागृहात  सविस्तर चर्चा घडवून आणण्याची मागणीही देशमुख यानी केली. 

टॅग्स :महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसशिवसेना