Join us

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून; सत्ताधारी-विरोधक येणार आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 12:45 PM

मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मुंबई विधानभवन येथे हे अधिवेशन पार पडेल. १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचं कामकाज होणार असून यानिमित्ताने पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत. आज झालेल्या विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक २०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.या बैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची  तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.  

टॅग्स :विधान भवन