Join us

गिर्यारोहणासाठी महाराष्ट्र प्रेरणादायी

By admin | Published: May 26, 2015 12:54 AM

हिमालयाच्या गिर्यारोहणासाठी महाराष्ट्रातील भूमी प्रेरणादायी आहे. हिमालयात गिर्यारोहण करायचे, तर शिवरायांनी बांधलेले गडकिल्ले सर करता यायलाच हवेत.

मुंबई : हिमालयाच्या गिर्यारोहणासाठी महाराष्ट्रातील भूमी प्रेरणादायी आहे. हिमालयात गिर्यारोहण करायचे, तर शिवरायांनी बांधलेले गडकिल्ले सर करता यायलाच हवेत. त्यांची रचना व खडतरपणा हा हिमालयाच्या प्रत्येक टप्प्याटप्प्याचे प्रशिक्षण देत असतो, असे स्पष्ट विचार एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या तुकडीचे प्रमुख कॅप्टन एम. एस. कोहली यांनी मांडले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आयोजित भारतीय एव्हरेस्ट मोहिमेचा सुवर्णमहोत्सव सोहळ््यात ते बोलत होते. कॅ. कोहली यांच्यासह मोहिमेतील सोनम वांग्याल, ब्रिगेडियर मुल्कराज, गुरचरण भांगू हे सदस्यही या प्रसंगी एव्हरेस्टच्या थरारक आठवणींना उजाळा देण्यास उपस्थित होते.ज्या एव्हरेस्टवर आनंदी विजयाचा झेंडा रोवण्याची स्वप्ने जगभरातील गिर्यारोहक बघतात, आज त्याच एव्हरेस्टच्या परिसरातील नागरिकांवर भूकंपामुळे दु:खद अंतकरणाने पांघरुण देण्याचे काम करावे लागत आहे. त्यांना मदतीचा हात नव्हे तर आत्मविश्वासाच्या साथीची गरज आहे. आम्ही नेपाळ माउंटेनिअरिंग फाउंडेशनच्या संपर्कात आहोत व नेपाळच्या भूकंपग्रस्तांना मानसिक आधार देण्यासाठी काही करण्याची आमची इच्छा असल्याचे भारताच्या पहिल्या एव्हरेस्ट मोहिमेचे नेते व नौदलातील निवृत्त कॅप्टन एम. एस. कोहली यांनी सांगितले. भारताने १९६०-६२ मध्ये एव्हरेस्ट मोहिमेतील अपयशामुळे १९६५ सालच्या मोहिमेला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. म्हणूनच आमच्यासह देशवासीयांच्या तीव्र भावनांमुळे आम्ही शिखरावर पोहोचू शकलो, असे विनम्र प्रतिपादन ब्रिगेडियर मुल्कराज यांनी केले. एव्हरेस्ट चढाईतील आव्हानांविषयी व समाजातील गिर्यारोहकांविषयी कॅ. कोहली म्हणाले, की एव्हरेस्ट सर करताना तेव्हाही एक ‘धाडस’ होते व आजही आहे. आमची मोहीम चिकाटीचा कस पाहणारी होती. शेकडो शिड्या आणि पूल लावावे लागले. हजार फुटांचा दोरखंड लावायचा आणि तोही कित्येकदा शोध घेऊन, अशी अनेक आव्हाने होती. आता कित्येकदा दोरखंड लावलेला असतो व २५ लाख रुपये भरल्यावर शेर्पांच्या जोरावर मोहिमा होतात. आधी वर्षभर एकही मोहीम केलेली नव्हती व आमच्यानंतर चार वर्षे मोहिमा गेल्या नाहीत. आजचे चित्र वेगळेच आहे. साहसाची आवड निर्माण झाली आहे. त्या साहसाला योग्य मार्गदर्शनाने गिर्यारोहणाचा पर्याय देऊन शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर याला स्थान मिळावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)