Join us  

आत्ता निवडणुका घ्या, चोर कोण आणि शोर कुणाचा हे कळेल; संजय राऊत यांचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 5:25 PM

खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका करत आत्ता निवडणुका घ्या, चोर कोण आणि शोर कुणाचा हे कळेल असं म्हणत आव्हान दिलं.

बुलढाण्यामध्ये आज पहाटे भीषण अपघात झाल्याने मृतांना श्रद्धांजली म्हणून भाजपानं ठाकरे गटाला प्रत्युत्तर देणारा मोर्चा रद्द केला. परंतु, आदित्य ठाकरेंचा मुंबई महापालिकेवरील मोर्चा ठरल्याप्रमाणे निघाला. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोर्चाला उपस्थित होते. यावेळी खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका करत आत्ता निवडणुका घ्या, चोर कोण आणि शोर कुणाचा हे कळेल असं म्हणत आव्हान दिलं.

"मुंबई महापालिकेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी फडकत ठेवला. तो उतरविण्यासाठी मुंबईतील दोन बोके आणि महाराष्ट्रातील खोके कारस्थानं करत आहेत. हे सांगण्यासाठीच हा मोर्चा आहे. भाजपची मोदी, शाह, फडणवीस यांची एकच इच्छा आहे, भ्रष्टाचार करायचा असेल तर आमच्या पक्षात या आणि स्वाभिमानाने करा. दुसऱ्या पक्षात राहिलात तर तुरुंगात जाल," असं म्हणत राऊतांची टीकेचा बाण सोडला.

"चोर कोण आणि शोर कोणाचा हे कळेल""आमची एकच मागणी आहे. निवडणुका घ्या. चोर कोण आणि शोर कोणाचा हे तुम्हाला लगेचच कळेल. ड्रोनच्या माध्यमातून हा विराट मोर्चा पाहा. नाही तुमच्या डोळ्यातील बुबुळे बाहेर आली तर पाहा. या लोकांना जाड भिंगाचा चष्मा आणून द्या. मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान केलेले ते स्मारक बाजुलाच आहे. ते हुतात्मे आज आपल्याकडे आशेने पाहत आहेत," असंही राऊत म्हणाले.

"काही उंदीर बिळातून पाहत असतील...""आज महापालिका बंद असेल. शनिवार आहे, परंतु काही उंदीर शिवसेनेचा हा मोर्चा किती मोठा आहे हे बिळातून पाहत असतील," असं म्हणत त्यांनी टोला लगावला. "सकाळपासून सर्वांना चिंता होती, धो धो पाऊत पडेल आणि मोर्चाचं काय होईल. पण इथे शिवसैनिकांचा पाऊस पडलाय. आम्हाला सूर्यदेवतेने आशीर्वाद दिलेत. आदित्य ठाकरे येताना हनुमानाच्या पाया पडले. बजरंगबली कर्नाटकात नाही पावला, पण आम्हाला मुंबईत आदित्यना गदा दिलीय. २०२४ मध्ये अशी ही गदा गरा गरा फिरवायची की या सर्वांना नेस्नाभूत करा," असं राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतएकनाथ शिंदेमहाराष्ट्रशिवसेना