Join us

कोरोनासारख्या वैश्विक महामारीचा सामना करून महाराष्ट्राला पुन्हा नवीन शिखरावर पोहोचवले पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2021 4:02 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांतील यशस्वी वाटचालीमुळे तसेच येथील व्यवसायांच्या उन्नतीमुळे महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांतील यशस्वी वाटचालीमुळे तसेच येथील व्यवसायांच्या उन्नतीमुळे महाराष्ट्र राज्य देशात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. अगदी २१ व्या शतकातही येथील प्रतिभावंत महाराष्ट्राला देशासह जगात मानाचे स्थान मिळवून देत आहेत. म्हणूनच १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात काही तरुण प्रतिभावंतांनी व्यक्त केलेल्या महाराष्ट्राबाबतच्या भावना त्यांच्याच शब्दांत.

* निसर्ग, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करणे गरजेचे

चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी सांगितले की, माझ्या चित्रांमध्ये, त्यातील छोट्या-छोट्या वस्तू, स्वयंपाकघरे, मातीने लिंपलेली घरे, जात्यावर दळण दळणाऱ्या स्त्रिया या सगळ्यांत महाराष्ट्राची संस्कृती ओतप्रोत भरलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीवर जन्माला आल्याचा मला अभिमान वाटतो. मला असेही वाटते की, आपण खऱ्या अर्थाने पुरोगामी असले पाहिजे. आपण एकत्र येऊन महाराष्ट्राला सर्वोत्तम बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः सध्या कोरोनासारख्या वैश्विक महामारीचा सामना करून आपण महाराष्ट्राला पुन्हा नवीन शिखरावर पोहोचविले पाहिजे. शिरापूरसारखे माझे छोटे गाव असो किंवा माझे राज्य असो, ते सुंदर असले पाहिजे. आपल्या ऐतिहासिक वास्तू, आपला वारसा आपण जपला पाहिजे. जगातील अनेक राष्ट्रांनी स्वतःची ओळख जपत, नैसर्गिक मूल्ये जपत, पर्यटनातून पुष्कळ आर्थिक प्रगती केली आहे. मला वाटते की, भविष्यात आपण आपल्या निसर्गाला तसेच ऐतिहासिक वारशाला आपली संपत्ती समजले पाहिजे. आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम केले पाहिजे.

* जग नावाच्या खेड्यात मराठी माणूस म्हणून ठामपणे उभे राहायला हवे

कान्स महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या मानसी देवधर या तरुणीला विचारले असता ती म्हणाली, तुकोबांच्या भक्तिगाथेपासून शिवबांच्या शौर्यगाथेपर्यंतचा जीवनकथांचा वारसा म्हणजे महाराष्ट्र; विशाल समुद्रापासून सह्याद्रीच्या रांगांपर्यंतचे अस्तित्व म्हणजे महाराष्ट्र; शेकडो बोलीभाषा कवेत घेऊन मराठी म्हणून नांदणारी एकभावना म्हणजे महाराष्ट्र; पुरणपोळीच्या मऊसुतपणापासून खर्ड्याचा ठसक्यापर्यंतच्या चवी म्हणजे महाराष्ट्र आणि कीर्तनाच्या टाळापासून लावणीच्या चाळापर्यंत ठेका धरणे म्हणजे महाराष्ट्र. या गौरवशाली इतिहासाची जाणीव मनात ठेवून हा वारसा जपण्यासाठी जग नावाच्या खेड्यामध्ये मराठी माणूस म्हणून ठामपणे उभे राहायला हवे. आजूबाजूला असलेल्या लोककला, मौखिक साहित्य परंपरा, संस्कृती, रीती, जत्रा, यात्रा निसर्गाची विविध रूपे यांचा विस्तार एवढा आहे की यातल्या गोष्टी चित्रभाषेत मांडायला एक आयुष्य पुरे पडणार नाही आणि मी तर नुकती कुठे सुरुवात केली आहे.

.......................