महाराष्ट्रव्यापी नाट्य संमेलन १३ ठिकाणी रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 02:07 AM2020-03-12T02:07:27+5:302020-03-12T02:08:10+5:30
तंजावर येथून २५ मार्च रोजी सुरू होणाऱ्या नाट्य संमेलनाचा समारोप मुंबईत होणार आहे.
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १००वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १३ ठिकाणी रंगणार आहे. तंजावर, सांगली, कोल्हापूर, रायगड, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, लातूर, कल्याण, नाशिक, बारामती, विदर्भ आणि मुंबई या ठिकाणी हे संमेलन २५ मार्च ते १४ जून या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. नाट्यजागर, नाट्यप्रयोग आणि इतर कार्यक्रम असे या संमेलनाचे स्वरूप असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
तंजावर येथून २५ मार्च रोजी सुरू होणाऱ्या नाट्य संमेलनाचा समारोप मुंबईत होणार आहे. ८ ते १४ जून या कालावधीत मुंबईत ‘एनसीपीए’मध्ये नाट्य संमेलन पार पडणार आहे. या संपूर्ण नाट्य संमेलनासाठी आम्ही ५० कोटींचे बजेट ठरवले होते; तरी या नाट्य संमेलनासाठी २७ ते ३० कोटी खर्च होण्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे कांबळी यांनी या वेळी स्पष्ट केले.
जगभर दहशत असलेल्या कोरोना विषाणूच्या संभाव्य संकटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, कोरोनाबाबत खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून काही निर्देश आले तर आम्हाला विचार करावा लागेल. परंतु सध्या तरी आम्ही नाट्य संमेलनाची तयारी जोमाने सुरू केली आहे. २७ मार्च रोजी नाट्य संमेलनाचा मुख्य उद्घाटन सोहळा सांगली येथे होईल. महाराष्ट्रव्यापी नाट्य संमेलनात काही व्यावसायिक नाटकांचे प्रयोगही होतील. एका लग्नाची पुढची गोष्ट, मोरूची मावशी, निम्मा शिम्मा राक्षस, आमने सामने, हिमालयाची सावली, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला आदी नाट्यप्रयोगांचा यात समावेश आहे, असे कांबळी म्हणाले.