मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांविरोधातील आपले आंदोलन आणखी तीव्र केले आहे. सुरुवातीला फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ्खट्याक आंदोलन करणा-या मनसेने बुधवारी विविध रेल्वे स्थानकांबाहेर झेंडा आंदोलन आणि मूक मोर्चे काढले.दादर स्थानकाबाहेर मनसे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, रिटा गुप्ता आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली मनसेने मूक मोर्चा काढला. आंदोलकांनी या वेळी आपल्या तोंडावर पट्टी बांधली होती. फेरीवाल्यांना हटविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळेच मनसेला आंदोलन करावे लागत आहे. जे काम प्रशासनाला करायला हवे ते मनसैनिक करत आहेत. तरीही मनसैनिकांच्या विरोधात गुन्हे नोंदविले जात आहेत. त्यांना अटक केली जात आहे. दादरच्या मूक मोर्चानंतरसुद्धा जवळपास ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई चुकीची असल्याची भावना मनसैनिकांनी व्यक्त केली.अटकसत्र टाळण्यासाठीच मनसेने आता मूक मोर्चा आणि झेंडा मोर्चा काढण्याचे धोरण स्वीकारले आहे. लोअर परळ परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी झेंडा मोर्चा काढला. मनसेच्या आंदोलनामुळेच महापालिका, रेल्वे आणि पोलीस प्रशासन फेरीवाल्यांवर कारवाई करत आहे. फेरीवाल्यांवर अंकुश ठेवण्याचे काम या यंत्रणांनी नियमितपणे करायला हवे.मनसे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करणारे प्रशासन इतरवेळी झोपा काढत असते का, असा सवाल माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी झेंडा मोर्चादरम्यान केला.
फेरीवाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मूक मोर्चा, रेल्वे स्थानकांबाहेर केले झेंडा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 2:05 AM