मुंबई- सोमवारपासून सुरू असलेला ओला, उबरच्या संपामधून आता ओला टॅक्सी चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण उबेर टॅक्सी चालक अजूनही संपावर ठाम आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे कॅब चालकांचीही आता आर्थिक परवड होऊ लागली आहे. कर्जाने घेतलेल्या वाहनांची कर्जे फेडण्यापुरते पैसेही मिळत नसल्याचा दावा चालक करत आहेत. त्यातच प्रवासी वाहतुक करणाऱ्या खासगी कंपन्यांकडून काळ्या यादीत टाकले जात आहे. याच्या निषेधार्थ राज्यातील ओला, उबेर चालक सोमवारपासून संपावर आहेत. पण आता ओला टॅक्सी चालकांनी संप मागे घेतला आहे. दरम्यान, उबेर अधिकाऱ्यांसोबत उद्या 1 वाजता बैठक बोलावण्यात आली असून यावेळी उबर संपाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती बैठकीतून मिळते आहे.
दरम्यान, संपामुळे ग्राहकांच्या झालेल्या गैरसोईबद्दल ओलाने दिलगिरी व्यक्त केली आहे. मागील काही वर्षांपासून ओला, उबेर या प्रवासी वाहतुक करणाऱ्या कंपन्यांच्या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पुण्यासह मुंबई, ठाणे व अन्य काही शहरांमध्ये रिक्षा, टॅक्साचालकांशी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे पुर्वी होणारा व्यवसाय व सद्यस्थितीतील व्यवसायात फरक पडला आहे. आता कंपन्यांच्या जोडल्या गेलेल्या कॅबचालकांना हा व्यवसाय परवडेना झाला असल्याचा दावा चालक करत आहेत. यापार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेने राज्यात सोमवारी कॅबचालकांचा संप पुकारला.
बैठकीत झालेले निर्णय- काळ्या यादीत टाकलेल्या ओला टॅक्सी चालकांना पुन्हा सेवेत येणार- इतर मागण्या फायनान्ससंबधी असल्याने त्यावर 15 दिवसात तोडगा काढण्याचं लेखी आश्वासन.- यापुढे ओलाबरोबचे सर्व करार मराठीत होणार. - ओला टॅक्सीवरील स्टिकर मराठीत असणार. - ओलाच्या ऑफिसमधील बाऊंसर हटविणार. - भागधारकासाठी विशेष योजना तयार केल्या जातील.